सोन्याच्या तोळ्यांचा बनावट लक्ष्मीहार घेऊन थेट फायनान्स कंपनीत गोल्ड लोन घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या ढाबाचालकाच्या धाडसाने सगळ्यांना थक्क केले. हा प्रकार सिडको पोलिसांनी उघडकीस आणला असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
हुसेननगर येथील शेख अन्वर शेख मुसा (वय ३७) हा ढाबाचालक मंगळवारी दुपारी २.३० वाजता एन-७ येथील केप्री फायनान्स कंपनीच्या शाखेत दाखल झाला. त्याने व्यवस्थापक ऋतुपर्ण टोनपे (वय ३३) यांच्याकडे ९२.९ ग्रॅम वजनाचे दोन लक्ष्मीहार ठेवून ५ लाख रुपयांच्या गोल्ड लोनची मागणी केली.
व्यवस्थापकांनी दागिन्यांची तपासणी करण्यासाठी ऑडिटर योगेश चिमकर व व्हॅल्युअर महादेव उचे, आनंद नवपुते यांच्याकडे दागिने सोपवले. तपासणीअंती दागिने योग्य असल्याचे आढळून आल्यामुळे ४.५ लाख रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले. अन्वरने तत्काळ कर्ज स्वीकारण्यास होकार दिल्यामुळे त्याच्या कर्जाची प्रक्रिया सुरू झाली.
मात्र, व्यवस्थापक टोनपे यांना काहीतरी शंका आली. त्यांनी ऑडिटरला दागिन्यांची पुन्हा तपासणी करण्याचे आदेश दिले. तपासणीत लक्ष्मीहार केवळ वरून सोन्याचा मुलामा दिलेला असून, आतमधील धातू साधा असल्याचे आढळून आले.
हा डाव उघडकीस आल्यावर अन्वरने पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी त्याला थांबवून ठेवले. यानंतर सिडको पोलिसांना माहिती देण्यात आली. उपनिरीक्षक प्रमोद देवकाते यांनी घटनास्थळी येऊन अन्वरला ताब्यात घेतले.
अधिक चौकशीदरम्यान अन्वरने कबूल केले की हा बनावट हार त्याच्या सराफा व्यवसाय करणाऱ्या मित्र ज्ञानेश्वर कुलथे याने तयार करून दिला होता. पोलिसांनी तत्काळ ज्ञानेश्वरलाही अटक केली.
दोघांविरुद्ध यापूर्वीही फसवणुकीचे दोन गुन्हे दाखल आहेत. मंगळवारी सकाळी दोघांनी अन्य दोन फायनान्स कंपन्यांमध्येही अशाच प्रकारे गोल्ड लोन घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात ते अपयशी ठरले. अखेरीस केप्री फायनान्स कंपनीने त्यांना जेलची वाट दाखवली.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/L5VeaWe1xj1HEg4MmTSJ2Q
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*