होमगार्ड भरतीच्या प्रक्रियेत फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मंगळवारी, जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या गोकुळ मैदानावर एका उमेदवाराच्या जागी डमी उमेदवाराला उभे केल्याचे उघड झाले. करण लालचंद खोलवाल (२६, रा. भोयगाव, ता. गंगापूर) हा मूळ उमेदवार रमेश ताराचंद राठोड (रा. पैठण) यांच्या जागी मैदानी चाचणीसाठी हजर होता.
गोकुळ मैदानावर जिल्ह्याची होमगार्ड भरती प्रक्रिया सुरू असून, कागदपत्रांची पडताळणी, छाती आणि उंची मापन, गोळाफेक आणि १६०० मीटर धावण्याची चाचणी घेतली जात आहे. यासाठी प्रत्येक उमेदवाराला चेस्ट क्रमांक दिला जातो. मंगळवारी सकाळी भरतीस सुरुवात झाल्यावर अनिषा वडमारे या अंमलदारांकडे २० उमेदवारांची जबाबदारी होती. त्यापैकी काहींनी लघुशंकेला जाण्याची परवानगी मागितली.
लघुशंकेनंतर परतलेल्या उमेदवारांमध्ये एकाने काळा मास्क आणि टोपी परिधान केली होती, ज्यामुळे संशय निर्माण झाला. अधिक चौकशी केल्यानंतर त्याने मूळ उमेदवाराच्या जागी चाचणी देत असल्याचे मान्य केले. पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली.
आरोपी करणने २१ ऑगस्ट रोजी अक्षय कृष्णा लाडच्या जागी देखील डमी उमेदवार म्हणून मैदानी चाचणी दिली होती. त्यासाठी करणला कैलास गंगाराम राठोड (रा. डोणगाव) याने ३० हजार रुपये दिले होते, तर अक्षयने २५ हजार रुपये दिल्याचे कबूल केले आहे. पोलिसांनी करणसह रमेश, कैलास आणि अक्षय यांच्यावर गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई केली आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/L5VeaWe1xj1HEg4MmTSJ2Q
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*