कर्णपुरा देवीची यात्रा लवकरच सुरू होत आहे, आणि भाविकांसाठी यंदा अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. दरवर्षी केवळ १५ फुटांचा रस्ता असायचा, ज्यामुळे भाविकांना दर्शनासाठी ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत होती. मात्र, यंदा छावणी परिषदेच्या सीईओ आकांक्षा तिवारी यांनी ५० फूटांचा रस्ता मोकळा ठेवून रहाट पाळणे आणि दुकाने उभारण्याचे आदेश कंत्राटदार गंगाधर जाधव यांना दिले आहेत.
चांगल्या नाश्त्याची आणि शुद्ध पाण्याची व्यवस्था
यात्रेच्या ठिकाणी भाविकांना चांगल्या दर्जाचा नाश्ता पुरवला जाईल आणि शुद्ध पाण्याची व्यवस्था केली जाईल. याबाबत कठोर सूचना देण्यात आल्या असून, या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे तिवारी यांनी स्पष्ट केले आहे.
स्वच्छता आणि सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना
यात्रास्थळी स्वच्छता आणि सुरक्षा यावर विशेष भर देण्यात आला आहे. भाविकांच्या सोयीसाठी ५० शौचालयांची उभारणी केली जाणार आहे. रस्त्यावर एन्ट्री आणि एक्झिटसाठी बांबूच्या सर्कलद्वारे वाहतुकीसाठी मार्ग मोकळा ठेवला जाईल. लाईट गेल्यास जनरेटरची व्यवस्था आणि सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचेही आदेश दिले आहेत.
नवरात्रोत्सवाला ३ ऑक्टोबरपासून सुरुवात
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने ३ ऑक्टोबरपासून यात्रेची सुरुवात होणार आहे. या यात्रेसाठी निविदा प्रक्रिया राबवून ९० लाख रुपयांचा कंत्राट गंगाधर जाधव यांना देण्यात आले आहे. स्वच्छता आणि सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी कंत्राटदाराकडे देण्यात आली असून, या तयारीची पाहणी सीईओ आकांक्षा तिवारी यांनी गुरुवारी केली.
महिला भाविकांच्या सुरक्षेसाठीही विशेष चर्चा करण्यात येणार आहे, आणि त्याबाबत पोलिस प्रशासनाशी समन्वय साधला जाणार आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/EWGD6GJ4OQPBO1WIPiOfkA
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*