सिल्लोड, प्रतिनिधीः हुंड्यासाठी मानसिक व शारीरिक छळ केल्याने आणि गर्भवती असलेल्या विवाहितेस बेदम मारहाण करून तिचा जीव घेतल्याचा धक्कादायक प्रकार सिल्लोड येथे घडला आहे. या प्रकरणी पतीसह सासरे व सासू यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयत विवाहितेचे नाव मनीषा सतीश सपकाळ (वय 24, रा. शास्त्री कॉलनी, सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) असून, तिचा पती सतीश लक्ष्मण सपकाळ, सासरा लक्ष्मण कडूबा सपकाळ, व सासू लीलाबाई लक्ष्मण सपकाळ या तिघांविरुद्ध शुक्रवारी सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मनीषाचा विवाह 2019 साली सतीश लक्ष्मण सपकाळ याच्यासोबत झाला होता. लग्नानंतर पती, सासू-सासरे तिचा मानसिक व शारीरिक छळ करत होते. मूलबाळ होत नसल्याच्या कारणावरून तिला टोमणे मारले जात आणि वारंवार मारहाण केली जात असे.
गुरुवारी (16 जानेवारी) पतीसह सासू-सासऱ्यांनी मनीषाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. ती गर्भवती असल्याने तिच्या पोटावरही प्रहार करण्यात आला. गंभीर मारहाणीनंतर तिचा मृत्यू झाला.
मनीषाचे वडील खंडू किसन शेळके (रा. रामपूर वाडी, ता. कन्नड) यांनी शुक्रवारी पोलिसांत फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/LJKkgCKh4n33MLqeQ0zqD2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*