छत्रपती संभाजीनगर: गुंतवणूकदारांना 3% मासिक लाभांश आणि विदेशात मोफत टूरचे आमिष दाखवून 35 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चार जणांविरोधात जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी सरताजसिंग अरजनसिंग चहल (वय 21, रा. म्हाडा कॉलनी, छत्रपती संभाजीनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, आरोपींनी गुंतवणूकदारांकडून खोट्या करारनाम्यांच्या आधारे पैसे उकळले. गुंतवणूकदारांना 3% मासिक लाभांश आणि विदेशात मोफत टूरची खोटी आश्वासने देत सुमारे 35 कोटी रुपयांची फसवणूक केली.
फिर्यादीने सांगितले की, आरोपी हर्षल योगेशभाई गांधी आणि प्रतीक एम. शहा (क्विक स्टार्ट 24 ग्रुपचे मालक), शितल सुधाकर मोतींगे (वय 32, ब्रँच मॅनेजर), तसेच विठ्ठल भागाजी तांदळे (वय 60, ब्रँच मॅनेजर) यांनी संगनमत करून गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केला. त्यांनी बनावट करार तयार करून ते खरे असल्याचे भासवले व त्यावर गुंतवणूकदारांकडून मोठी रक्कम वसूल केली.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी त्याच्यासह त्याच्या कुटुंबीयांची 21.50 लाख रुपयांची फसवणूक केली. याशिवाय, इतर गुंतवणूकदारांची सुमारे 35 कोटी रुपयांची रक्कम परत न देता फसवणूक केली.
पोलिसांचा तपास सुरू:
जिन्सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही फसवणूक झाल्याने पोलीस निरीक्षकांच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक मोहसीन सय्यद करत आहेत.
सदर घटनेने गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/LJKkgCKh4n33MLqeQ0zqD2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*