छत्रपती संभाजीनगर: “तुमको खत्म कर देता”, असे म्हणत कुख्यात गुन्हेगाराने पोलिस पथकाला चाकू दाखवत धमकवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. १५ दिवसांतील पोलिसांवर हल्ल्याची ही चौथी घटना आहे.

गुन्हेगार शेख वाहेद शेख मोहसीन याने गुन्हे शाखेच्या पथकावर चाकूने हल्ला केला. पथकातील पोलिसांनी हा हल्ला चुकवला, मात्र या झटापटीत वाहेदने पोलिस अंमलदार विजय निकम यांच्या दंडाला कडकडून चावा घेतल्याने ते जखमी झाले आहेत.

गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक प्रवीण वाघ यांना वाहेदने कांचनवाडी येथील दुकान फोडल्याची माहिती मिळाल्यानंतर, ते विजय निकम, मनोहर गिते, कृष्णा गायके आणि ज्ञानेश्वर पवार यांच्या पथकासह जटवाडा रोडवरील एका चहाच्या हॉटेलजवळ पोहोचले. तेथे वाहेद असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता, त्याने चाकू काढून हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

पोलिस अंमलदार निकम यांनी त्याला कंबरेच्या मागून पकडले. त्यावेळी वाहेदने निकम यांच्या दंडाला चावा घेतला आणि सतत चाकू फिरवत राहिला. अखेर, पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला अटक केली. जखमी अंमलदार निकम यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गुन्हेगार शेख वाहेद हा एक कुख्यात गुन्हेगार असून त्याच्यावर आतापर्यंत लूटमार, दरोडा, हत्येचा प्रयत्न, आणि पोलिसांवर हल्ल्याचे नऊ गंभीर गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणाचा तपास सहायक निरीक्षक शेषराव खटाणे करत आहेत. याशिवाय, वाहेदचा भाऊ देखील क्रूर गुन्हेगार असून तो सध्या हत्येच्या गुन्ह्यात कारागृहात आहे.

पोलिसांवरील वाढती हल्ल्यांची चिंता:

छत्रपती संभाजीनगरात पोलिसांवरील हल्ल्यांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. १५ दिवसांत हा चौथा हल्ला असल्यामुळे पोलिसांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त होत आहे.

वाहेद याला अटक करण्यात आली असून, या प्रकरणाचा अधिक तपास गुन्हे शाखेच्या पथकाकडून सुरू आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/LJKkgCKh4n33MLqeQ0zqD2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,041 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क