छत्रपती संभाजीनगर: प्रोझोन मॉलसमोर असलेल्या हनफिज मोबाइल कलेक्शनमध्ये १६ जानेवारीच्या मध्यरात्री चोरट्यांनी शटर तोडून तब्बल १६० महागड्या मोबाइलची चोरी केली. या मोबाइलची एकूण किंमत ४० लाख ८८ हजार ८४८ रुपये आहे. चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
हनफिज मोबाइल कलेक्शनचे मालक अब्रार जावेद हनफी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १६ जानेवारी रोजी रात्री १० वाजता त्यांनी दुकान बंद केले होते. मध्यरात्रीनंतर १२:३० वाजण्याच्या सुमारास चार चोरटे एका पांढऱ्या विनाक्रमांकाच्या कारमधून दुकानाजवळ आले. त्यांनी शटरला लावलेली लोखंडी पट्टी तोडली आणि दुकानातील काच फोडून दोन जण आत घुसले, तर उर्वरित दोन जण बाहेर थांबले.
दुकानात घुसलेल्या चोरट्यांनी सॅमसंग, विवो, आयफोन, ओप्पो, रेडमी आणि मोटोरोला यांसारख्या नामांकित कंपन्यांचे सुमारे १६० मोबाइल भराभर बॅगा आणि बॉक्समध्ये भरले. अवघ्या १५ मिनिटांत चोरी करून चोरटे पसार झाले.
दुसऱ्या दिवशी सकाळी दुकान उघडताना हा प्रकार उघडकीस आला. चोरी झालेल्या मोबाइलमध्ये ५२ सॅमसंग मोबाइल (१७.६७ लाख रुपये), ४६ विवो मोबाइल (९.३७ लाख रुपये), ६ आयफोन (४.८३ लाख रुपये), १६ ओप्पो मोबाइल (२.२६ लाख रुपये), ३८ रेडमी मोबाइल (६.२५ लाख रुपये) आणि २ मोटोरोला मोबाइल (५० हजार रुपये) यांचा समावेश आहे.
ही घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, चोरट्यांनी पुरावे नष्ट होण्यासाठी हातात ग्लोव्हज घातल्याचे दिसून आले. पावत्यांची मोजदाद आणि अन्य तांत्रिक बाबींच्या प्रक्रियेमुळे तक्रारदाराने उशिरा तक्रार दिली, त्यामुळे गुन्हा नोंदवण्यात विलंब झाला.
एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक कैलास लहाने या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेमुळे सिडको परिसरात खळबळ उडाली असून, चोरी करणाऱ्या टोळीचा तपास गतीने सुरू आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/LJKkgCKh4n33MLqeQ0zqD2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*