फुलंब्री तालुक्यातील मुर्शिदाबादवाडी येथे शनिवारी (ता. १९) रात्री चोरट्यांनी शेतकऱ्याच्या कुटुंबावर हल्ला करत १ लाख ८२ हजार रुपयांचा ऐवज लुटला. या घटनेने संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आदिनाथ विश्वनाथ विटेकर (वय ४५) हे कुटुंबासह किनगाव शिवारातील गट क्रमांक १३६ मध्ये राहतात. शनिवारी रात्री वाढदिवसाचा कार्यक्रम संपवून सर्व जण झोपी गेले होते. रात्री वीज आल्याने आदिनाथ हे शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी गेले. विहिरीजवळ वीजपंप बंद का पडला, हे पाहण्यास ते गेले असता चार चोरट्यांनी त्यांच्यावर हल्ला करत त्यांचे हातपाय व तोंड बांधून ठेवले.
चोरट्यांपैकी दोघे आदिनाथ यांच्यावर नजर ठेवून उभे राहिले, तर उर्वरित दोघे घरात शिरले. झोपलेल्या विटेकर कुटुंबीयांना धमकावत त्यांनी पैशांची आणि दागिन्यांची मागणी केली. या दरम्यान, विटेकर यांचा मुलगा प्रल्हाद आणि पत्नी जागे झाले. चोरट्यांनी पत्नीला धमकावून १ लाख २५ हजार रुपयांची रोकड आणि अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतले.
‘सगळं घ्या, पण माझ्या नवऱ्याला मारू नका,’ अशी विनवणी करत विटेकर यांच्या पत्नीने एका चोरट्याला ढकलून घराबाहेर पळ काढली. आरडाओरड केल्यामुळे शेजारील शेतकरी जागे झाले. परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून चोरटे पळून गेले.
चोरट्यांनी एकूण १ लाख ८२ हजार रुपयांचा ऐवज, ज्यात १ लाख २५ हजार रुपये रोकड व सोन्याचे दागिने होते, लंपास केले.
पोलिस तपास सुरू:
आदिनाथ विटेकर यांच्या तक्रारीवरून फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संजय सहाने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत आहेत.
गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण:
या घटनेने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपींना लवकरच अटक करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/LJKkgCKh4n33MLqeQ0zqD2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*