नवीन बीड बायपास मार्गाजवळील एका खदानीत मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या एका दहा वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ११ वाजता देवळाई परिसरातील म्हाडा कॉलनीत घडली आहे.
मुराद नजमोद्दीन सय्यद (वय १२, ह.मु. म्हाडा कॉलनी, देवळाई परिसर, छत्रपती संभाजीनगर, मूळ गाव नगर) असे मृत मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
प्राप्त माहितीनुसार, मंगळवारी सकाळी मुराद दोन मित्रांसोबत घराजवळील खदानीत पोहण्यासाठी गेला होता. मात्र त्याला पोहता येत नसल्यामुळे तो खदानीत बुडाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, तोपर्यंत त्याचा शोध लागला नव्हता.
त्यानंतर अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्नीशमन दलाच्या जवानांनी शोध मोहीम राबवून दुपारी दीड वाजता मुरादचा मृतदेह बाहेर काढला. मृत मुरादच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, आणि एक बहिण असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BJSJXD6pg1BLvrKC4OK11S
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*