शहरातील बुद्धलेणीच्या पायथ्याशी असलेल्या विहार आणि विपश्यना केंद्राला अतिक्रमित असल्याचे सांगत महानगर पालिकेने नोटीस बजावल्यानंतर, आज या कारवाईविरोधात भिक्खू संघ, उपासक आणि आंबेडकरी समुदायाने आक्रमक पवित्रा घेतला. या निषेधासाठी शहरात भव्य मोर्चा काढण्यात आला.
क्रांती चौक ते विभागीय आयुक्तालयापर्यंत निघालेल्या या मोर्चात लाखोंच्या संख्येने बौद्ध अनुयायी आणि इतर धर्मीय नागरिकांनी सहभाग घेतला. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरातील शाळांना आणि विद्यापीठाच्या शैक्षणिक तसेच प्रशासकीय विभागांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली होती. याशिवाय, शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
महापालिकेने बुद्धलेणीच्या पायथ्याशी असलेल्या विहार-विपश्यना केंद्राला अतिक्रमण असल्याचे सांगून नोटीस दिली होती. परंतु, हे स्थळ बौद्ध अनुयायी आणि आंबेडकरी समुदायासाठी पवित्र असून, या कारवाईला मोठ्या प्रमाणात विरोध केला जात आहे. बुद्धलेणी बचाव समितीच्या वतीने आपल्या मागण्यांसाठी हा महामोर्चा काढण्यात आला होता.
मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांनी या लढ्याला केवळ एका कारवाईविरोधातील संघर्ष न मानता, तो आमच्या अस्तित्वाचा लढा असल्याचे सांगितले.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/E3cu6nJZUyE6deFZQWJ9le
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*