शहरात आर्थिक गुंतवणुकीच्या नावाखाली मोठा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. एका सुशिक्षित तरुणाने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास महिन्याकाठी १५ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून तब्बल १९०० ठेवीदारांना १०० कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मनोजराजे विष्णू भोसले (वय ३५, रा. माउलीनगर, बीड बायपास) असे या महाठकाचे नाव आहे.
हाई-प्रोफाईल कंपनीचा फसवा मुखवटा
२०२१ साली मनोजराजेने ‘एस.एम. ग्रोथ’ नावाने कंपनी स्थापन केली आणि शेअर मार्केट ट्रेडिंगचा धंदा असल्याचा बनाव केला. या आडाख्याने त्याने अनेक ठेवीदारांना १०, १५, २० महिन्यांच्या कालावधीत १५ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवले. उल्कानगरी येथील खिंवसरा पार्कमध्ये अत्याधुनिक कार्यालय उभे करून मनोजने आपला व्यवसाय सुरू केला.
‘ऑडिट’चा बहाणा आणि भामटा पसार
डिसेंबर २०२३ पर्यंत काही ठेवीदारांना परतावा मिळाल्याने सगळे काही सुरळीत असल्याचा भास निर्माण झाला. मात्र, पुढे ‘ऑडिट’च्या बहाण्याने पैसे देणे बंद करण्यात आले. ठेवीदारांची फसवणूक उघड होण्याआधीच मनोज मार्च २०२४ मध्ये पसार झाला. शहरासह वसमत येथील जवळपास २ हजार ठेवीदारांना तब्बल १०० कोटी रुपयांचा गंडा घालण्यात त्याने यश मिळवले.
सध्या खिंवसरा पार्कमधील मनोजचे कार्यालय रिकामे असून, गाळा भाड्याने देण्याचा बोर्ड लावण्यात आला आहे. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला असून, मंगळवारी ठेवीदारांना अधिक तपशील देण्यासाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BkL2FgwQUTO5Drq9ffF9RJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*