छत्रपती संभाजीनगर : जुना वाद आणि सतत पैसे मागण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान रक्तरंजित हाणामारीत झाले. दोन आतेभावांनी मामेभावाच्या डोक्यात आणि मानेवर हातोड्याने घाव घालत, तसेच लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून त्याचा निर्घृण खून केला. ही थरारक घटना रविवारी (दि. ३०) सकाळी सुमारे १० वाजता जिन्सी परिसरातील मदनी चौकाजवळील टाकळकर सोसायटीत घडली.

फारेस बिन अब्दुल अजिज अलकसेरी घाव (वय ३२, रा. पडेगाव) असे मृताचे नाव आहे. या हल्ल्यात त्याचा मित्र सय्यद शहेजाद अली ऊर्फ सिराज (वय ३०, रा. कासबरी दर्गाजवळ, पडेगाव) गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी जिन्सी पोलिसांनी अहमद खलील बादाम (वय ४०) आणि अदनान खलील बादाम (वय ३५, दोघे रा. बारी कॉलनी) या दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

फारेस हा कचरा गाडी चालवण्याचे काम करत होता. रविवारी सकाळी तो मित्र शहेजादसोबत कचरा गाडी घेऊन टाकळकर सोसायटीत पर्यवेक्षकासोबत बोलत थांबला होता. त्याचवेळी अहमद आणि अदनान तेथे आले. जुन्या वादातून आणि पैशांच्या कारणावरून त्यांच्यात बाचाबाची सुरू झाली. काही क्षणांतच वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.

अदनानने लोखंडी हातोड्याने फारेसच्या डोक्यावर आणि मानेवर वार केले, तर अहमदने लोखंडी रॉडने त्याच्यावर हल्ला केला. फारेसला वाचवण्यासाठी शहेजादने मध्यस्थी केली असता त्याच्यावरही हल्ला करण्यात आला. दोघेही गंभीर जखमी अवस्थेत खाली कोसळले. नागरिकांनी त्यांना घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, अतिरक्तस्रावामुळे उपचारादरम्यान सायंकाळी फारेसचा मृत्यू झाला.

घटना घडताच जिन्सी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या काही तासांत दोन्ही आरोपींना अटक केली. उपनिरीक्षक सुनील मोरे अधिक तपास करीत आहेत. प्राथमिक तपासात जुन्या वादासह पैशांचे व्यवहार आणि नशेखोरीची किनार असल्याचे समोर आले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KYaIrqX6xIM3SpZ1FYjFWw?s=cl&p=a&ilr=0

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

557 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क