छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षेदरम्यान वाणिज्य शाखेतील ‘डायरेक्ट टॅक्स’ या विषयाच्या पेपरफुटीचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, संपूर्ण शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. दुपारी 2 वाजता होणारा 80 गुणांचा पेपर काही तास आधीच व्हॉट्सअॅपवर पीडीएफ स्वरूपात विक्रीसाठी उपलब्ध झाल्याचे समोर आले आहे.
या प्रकाराची माहिती दोन दिवसांपूर्वीच मराठवाडा इन्स्टिट्यूट ऑफ करिअर एज्युकेशन अँड रिसर्चचे संचालक डॉ. सतीश सुराणा यांच्या लक्षात आली होती. परीक्षा केंद्राबाहेर विद्यार्थ्यांच्या संशयास्पद हालचाली दिसत असल्याने त्यांनी 11 एप्रिल रोजी परीक्षा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी एका विद्यार्थ्याच्या मोबाईलमध्ये संबंधित पेपरची पीडीएफ फाइल आढळून आली.
मोबाईल तपासणीदरम्यान व्हॉट्सअॅप चॅटमधून धक्कादायक बाब समोर आली. सकाळी 10 वाजल्यापासूनच पेपर देण्याचे आमिष दाखवत 140 रुपये ऑनलाईन पाठवण्यास सांगण्यात आले होते. क्यूआर कोडद्वारे पैसे स्वीकारल्यानंतर दुपारी 1.10 वाजता विद्यार्थ्याला पेपरची पीडीएफ पाठवण्यात आल्याचे निष्पन्न झाले.
प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉ. सुराणा यांनी तात्काळ विद्यापीठ प्रशासनाला माहिती दिली. त्यानंतर परीक्षा विभागाचे पथक तातडीने केंद्रावर दाखल झाले आणि चौकशीला सुरुवात केली. पेपर नेमका कुठून आणि कोणत्या माध्यमातून फुटला, याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे विद्यापीठाच्या परीक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/KuJrJlfinbj4dlldQCNIAb?mode=gi_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*