छत्रपती संभाजीनगर : वटसावित्री पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरातील वाळूज महानगर परिसरातील करोडी शिवारात ‘पत्नी पीडित पुरुष आश्रमा’च्या वतीने रविवारी अनोख्या पद्धतीने ‘पिंपळ पौर्णिमा’ साजरी करण्यात आली. राज्याच्या विविध भागांतून आलेल्या पत्नीपीडित पुरुषांनी पिंपळ वृक्षाचे विधिवत पूजन करत त्याला तब्बल १०८ उलट्या प्रदक्षिणा घातल्या.
या अनोख्या उपक्रमाच्या माध्यमातून पुरुषांनी आपल्या वैवाहिक आयुष्यातील मानसिक, सामाजिक आणि कायदेशीर समस्यांकडे शासन व समाजाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. गेल्या सात वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले.
वटसावित्री पौर्णिमेनिमित्त महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात. त्याच दिवशी पत्नीकडून त्रस्त असल्याचा दावा करणारे पुरुष एकत्र येऊन पिंपळ वृक्षाचे पूजन करतात. यावेळी उपस्थित पुरुषांनी आपल्या वैयक्तिक अनुभवांना वाचा फोडत वैवाहिक जीवनातील अडचणी मांडल्या.
कार्यक्रमादरम्यान कौटुंबिक वादांमुळे पुरुषांमध्ये वाढत असलेल्या आत्महत्यांचे प्रमाण, खोट्या तक्रारींचा होणारा परिणाम तसेच पुरुषांच्या मानसिक आरोग्याच्या प्रश्नावर गंभीर चर्चा करण्यात आली. समाजात पुरुषांच्या मानसिक आरोग्याच्या मुद्द्याकडेही संवेदनशीलतेने पाहण्याची गरज असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.
यावेळी पत्नी पीडित पुरुष आश्रमाचे अध्यक्ष ॲड. भारत फुलारे यांनी सांगितले की, “हा संघर्ष महिलांविरोधात नसून महिला आणि पुरुष या दोघांनाही समान न्याय मिळावा, हीच संस्थेची भूमिका आहे. महिलांप्रमाणेच पत्नीपीडित पुरुषांच्या समस्याही गांभीर्याने घेतल्या जाव्यात आणि त्यांच्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात यावी,” अशी मागणी त्यांनी केली.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IvoLcj6rZSSF1R9c7f0Ijh?s=cl&p=a&ilr=2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*