छत्रपती संभाजीनगर : शहरात २०२५ या वर्षाला निरोप देत २०२६ या नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी कडेकोट बंदोबस्ताचे आदेश दिले आहेत. ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री शहरात होणारी गर्दी, उत्साह आणि संभाव्य अनुचित प्रकार लक्षात घेता विशेष नियोजन करण्यात आले आहे.
घातपात, छेडछाड, दंगली तसेच अपघात टाळण्यासाठी शहरातील १७ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विविध ठिकाणी फिक्स पॉइंट, चेक पोस्ट आणि विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सिटी चौक, क्रांती चौक, निराला बाजार, कॅनॉट प्लेस, टीव्ही सेंटर, रेल्वे स्थानक यांसारख्या गर्दीच्या ठिकाणी विशेष बंदोबस्त तैनात असेल. प्रत्येक फिक्स पॉइंटवर एक उपनिरीक्षक आणि पाच पोलीस कर्मचारी, शस्त्रधारी कर्मचाऱ्यासह नेमण्यात आले आहेत. हा बंदोबस्त ३१ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजल्यापासून कार्यान्वित होणार आहे.
नववर्षाच्या रात्री मद्यधुंद वाहनचालकांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांचे ‘ड्रिंक्स अँड ड्राईव्ह’ पथक सक्रिय राहणार आहे. हर्सल नाका, जालना नाका, बीड नाका, पैठण रोड नाका, दौलताबाद टी पॉइंट आणि वाळूज नाका येथे बॅरिकेडिंग करून वाहनांची तपासणी केली जाईल. मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर ब्रेथ अॅनालायझरद्वारे कडक कारवाई केली जाणार आहे.
हॉटेल, ढाबे आणि लॉजेसमध्ये होणारे वाद, छेडछाड तसेच अनधिकृत मद्यविक्री रोखण्यासाठी गुन्हे शाखेची पाच विशेष पथके गस्त घालणार आहेत. शहराच्या प्रवेशद्वारांवर नाकाबंदी करून संशयास्पद वाहनांची तपासणी केली जाईल. तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी दामिनी पथक सतत गस्तीत राहणार आहे.
पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी नागरिकांना नववर्षाचे स्वागत आनंदात पण शांततेत करण्याचे आवाहन केले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.