छत्रपती संभाजीनगर : शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनत असताना आता महापालिका प्रशासनाने जुन्या शहरातील अतिक्रमणांविरोधात कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे. मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविल्यानंतर प्रशासनाने आपला मोर्चा जुन्या शहराकडे वळविला असून, रोशन गेट ते चंपा चौक आणि चंपा चौक ते कटकट गेट या वर्दळीच्या मार्गांवरील अतिक्रमणे शनिवारी (दि. १७) हटविण्यात येणार आहेत.
या कारवाईच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि. १५) महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने संबंधित मार्गांची पाहणी केली. अतिक्रमण विभागाचे सनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने चंपा चौक परिसरासह संपूर्ण मार्गाची पाहणी करून रस्त्याच्या हद्दीत येणारे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून हटविण्याचे आवाहन दुकानदार आणि नागरिकांना केले. यासाठी परिसरात ध्वनिक्षेपकाद्वारे घोषणाही करण्यात आल्या.
जुन्या शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर दुकानदारांनी दुकानांचे, तर काही नागरिकांनी घरांचे बांधकाम रस्त्याच्या हद्दीपर्यंत वाढविले आहे. त्यामुळे रस्त्यांची रुंदी कमी झाली असून, पादचाऱ्यांसाठी असलेले फुटपाथही अतिक्रमणांच्या विळख्यात सापडले आहेत. परिणामी, नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागत असून, वाहनचालकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करून अतिक्रमणे हटविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात होती.
दरम्यान, अतिक्रमण हटविण्यापूर्वी संबंधितांना नोटीस द्यावी, अशी मागणी काही स्थानिक नागरिकांनी केली आहे. मात्र, रस्ते आणि सार्वजनिक जागांवरील अतिक्रमण हटविण्यासाठी स्वतंत्र नोटीस देण्याची आवश्यकता नसल्याची भूमिका महापालिका प्रशासनाने स्पष्ट केली आहे.
शनिवारी होणाऱ्या मोहिमेसाठी जेसीबीसह अतिक्रमण विभागाचे पथक तैनात करण्यात येणार आहे. या कारवाईत रस्त्यांवरील अडथळे दूर करून वाहतुकीसाठी मार्ग मोकळा करण्यावर भर दिला जाणार आहे.
अडथळा आणल्यास थेट गुन्हे दाखल
अतिक्रमण हटाव मोहिमेत कोणीही अडथळा निर्माण केल्यास संबंधितांविरुद्ध थेट गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा महापालिकेचे सनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांनी दिला आहे. त्यामुळे शनिवारी जुन्या शहरातील या दोन प्रमुख मार्गांवर होणाऱ्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CF89MLzjXiJLRGIbwDr7te
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*