छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र विधान परिषदेच्या औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक २०२६ मध्ये मतदान करताना मतदारांना पसंतीक्रमानुसार मतदान करावे लागणार आहे. ही पद्धत सर्वसाधारण निवडणुकीतील मतदानापेक्षा वेगळी असल्याने मतदारांनी नियम समजून घेऊन मतदान करणे आवश्यक आहे. पसंतीक्रम चुकीच्या पद्धतीने नोंदविल्यास मतपत्रिका अवैध ठरण्याची शक्यता असल्याने प्रशासनाकडून मतदारांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
प्रथम पसंतीचा ‘१’ हा अंक महत्त्वाचा
मतपत्रिकेवर उमेदवारांच्या नावासमोरील पसंतीक्रमाच्या रकान्यात मतदाराने आपल्या सर्वाधिक पसंतीच्या उमेदवारासमोर ‘१’ हा अंक लिहिणे आवश्यक आहे. प्रथम पसंती नोंदविणे बंधनकारक असून त्यानंतर इच्छेनुसार इतर उमेदवारांना ‘२’, ‘३’, ‘४’ असे पुढील पसंतीक्रम देता येतात. सर्व उमेदवारांना पसंतीक्रम देणे आवश्यक नाही.
मात्र, एकाच पसंतीक्रमाचा अंक दोन उमेदवारांसमोर लिहू नये. तसेच एका उमेदवाराच्या नावासमोर एकापेक्षा अधिक पसंतीक्रम नोंदविणे टाळावे. पसंतीक्रम शब्दांमध्ये न लिहिता अंकांमध्येच स्पष्टपणे नोंदवावा.
जांभळ्या स्केच पेनचाच वापर करा
मतदान केंद्रावर पसंतीक्रम नोंदविण्यासाठी विशेष जांभळ्या रंगाचा स्केच पेन उपलब्ध करून दिला जाणार आहे. मतदारांनी याच अधिकृत पेनचा वापर करावा. स्वतःजवळील बॉलपेन, साधा पेन किंवा पेन्सिल वापरू नये.
मतपत्रिकेवर अनावश्यक खूण नको
मतपत्रिकेवर पसंतीक्रमाव्यतिरिक्त कोणतीही खूण करू नये. स्वाक्षरी, नाव, आद्याक्षरे, अंगठ्याचा ठसा किंवा अन्य शब्द लिहिणे टाळावे. उमेदवाराच्या नावासमोर टिक (✓) किंवा क्रॉस (X) अशी खूण करण्याऐवजी केवळ अंकांमध्ये पसंतीक्रम नोंदवावा.
सजग मतदानातून लोकशाही मजबूत
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सहभागी होणाऱ्या मतदारांनी मतदानापूर्वी पसंतीक्रमाची पद्धत समजून घ्यावी. प्रथम पसंती अचूक नोंदवावी, पुढील पसंती ऐच्छिक ठेवावी आणि मतपत्रिकेवर अनावश्यक खुणा करू नयेत. प्रत्येक मत महत्त्वाचे असल्याने नियमांचे पालन करून मतदानाचा हक्क बजावणे ही प्रत्येक मतदाराची जबाबदारी आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CF89MLzjXiJLRGIbwDr7te
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*