छत्रपती संभाजीनगर : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने १ जानेवारी ते ३१ जानेवारीदरम्यान विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवत विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली. अवघ्या एका महिन्यात विविध रेल्वेगाड्यांमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या तब्बल २१ हजार प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून दंडासह १ कोटी २५ लाख १७ हजार २९० रुपयांचा महसूल वसूल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही रक्कम जानेवारी २०२५ च्या तुलनेत १५.०१ टक्क्यांनी अधिक असल्याची माहिती नांदेड विभागाने दिली.
या विशेष मोहिमेसाठी जानेवारी महिन्यात एकूण २१९ तिकीट तपासणी कर्मचारी कार्यरत होते. त्यामध्ये ३४ स्क्वॉड कर्मचारी, १६७ ऑन-बोर्ड (अमेनिटी) कर्मचारी तसेच १८ स्टेशनरी कर्मचाऱ्यांचा समावेश होता. मोहिमेअंतर्गत १२ फोर्ट्रेस तपासण्या, २ मॅसिव्ह तपासण्या आणि १ स्पॉट तपासणी करण्यात आली. याशिवाय १५ अचानक व रात्रकालीन तपासण्या घेण्यात आल्या. मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आरपीएफ आणि रेल्वे पोलिसांचे सहकार्यही घेण्यात आले.
४ जानेवारी रोजी सर्वाधिक कारवाई करण्यात आली. त्या दिवशी एकाच दिवसात ९०९ प्रकरणे नोंदवून ५ लाख ४८ हजार ७३८ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही जानेवारी महिन्यातील सर्वोच्च एकदिवसीय कामगिरी ठरली.
ही मोहीम आदिलाबाद-नांदेड, परभणी-परळी, छत्रपती संभाजीनगर-मनमाड तसेच विभागातील इतर महत्त्वाच्या मार्गांवर राबविण्यात आली. वरिष्ठ मंडल वाणिज्य व्यवस्थापक डॉ. विजय कृष्णा यांनी सांगितले की, ही कारवाई केवळ दंडात्मक नसून प्रामाणिकपणे तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी आहे. दंड टाळण्यासाठी सर्व प्रवाशांनी वैध तिकीट घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/LC9pzB4lHXXKDuIr4cUPAq?mode=gi_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*