छत्रपती संभाजीनगर : शहरात गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असून शनिवारी (२१ फेब्रुवारी) उन्हाने अक्षरशः आग ओकायला सुरुवात केली. शहराचे कमाल तापमान ३४.४ अंश सेल्सियसवर पोहोचले असून हा या हंगामातील आतापर्यंतचा उच्चांक ठरला आहे. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता जाणवू लागली होती. दुपारपर्यंत सूर्यकिरणांचा चटका अधिकच वाढल्याने नागरिक घामाघूम झाले. मुख्य रस्ते, चौक आणि बाजारपेठांमध्ये दुपारच्या सुमारास नेहमीपेक्षा कमी गर्दी दिसून आली.
यंदा फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनच तापमानाचा पारा तिशीच्या पुढे गेला होता. शनिवारी किमान तापमान १८.८ अंश सेल्सियस नोंदवले गेले. सकाळी थोडासा गारवा जाणवत असला तरी दुपारनंतर उकाडा असह्य होत आहे. संध्याकाळी सूर्यास्तानंतर ऊन कमी झाले तरी वातावरणातील उष्णता कायम राहत असल्याने नागरिकांना दिलासा मिळत नाही. अचानक वाढलेल्या तापमानामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रस्त्यावर काम करणारे कामगार अधिक त्रस्त झाले आहेत.
दरम्यान, हवामान विभागाने काहीसा दिलासादायक अंदाज वर्तविला आहे. उत्तर भारतात सध्या ‘पश्चिमी विक्षोभ’ सक्रिय असून तेथे पाऊस आणि गारवा कायम आहे. या प्रणालीचा परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावरही होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. आठवड्याअखेरीस किमान तापमानात सुमारे २ अंशांनी घट होऊन ते १७ अंशांपर्यंत खाली येईल, तर कमाल तापमान ३१ अंशांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत शहरवासीयांना उकाड्यातून काहीसा दिलासा मिळण्याची आशा व्यक्त होत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/LC9pzB4lHXXKDuIr4cUPAq?mode=gi_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*