छत्रपती संभाजीनगर : जालना रोडवरील वडोद फाट्याजवळील प्रसिद्ध ‘अभिजित काळे बंधू परभणीकर’ हॉटेलवर अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या छाप्यात गंभीर स्वरूपाची अस्वच्छता आढळून आल्याने हॉटेलचा परवाना पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आला आहे. शहरातील मोठ्या हॉटेल्सवर अन्न व औषध प्रशासनाने केलेली ही सलग तिसरी मोठी कारवाई ठरली असून, या कारवाईमुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरसे यांनी आपल्या पथकासह या हॉटेलची अचानक तपासणी केली. तपासणीदरम्यान हॉटेलच्या परिसरात तसेच मुख्यत्वे किचन विभागात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता आढळून आली. अन्नपदार्थ तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जागेची स्वच्छता समाधानकारक नसल्याचे दिसून आले. तसेच तयार करण्यात आलेले अन्नपदार्थ आणि कच्चा माल साठवून ठेवताना अन्न सुरक्षा नियमांचे पालन करण्यात आले नसल्याचेही निदर्शनास आले.

तपासणीदरम्यान केवळ अस्वच्छताच नव्हे, तर अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यांतर्गत परवाना मिळविण्यासाठी आवश्यक असलेल्या अटी व शर्तींचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले. यामुळे प्रशासनाने तातडीने कारवाई करत हॉटेलचा परवाना पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्याचा निर्णय घेतला.

अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त एस. आर. करकळे आणि सहायक आयुक्त डी. व्ही. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. शहरातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न उपलब्ध व्हावे, यासाठी अशा प्रकारच्या तपासणी मोहिमा पुढील काळात अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, शहरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि अन्य खाद्य व्यवसायिकांनी स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/C3CCRbqDXDA2dKhWRQo4YD?s=cl&p=a&ilr=2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,623 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क