छत्रपती संभाजीनगर : शहरात दारूच्या नशेत पैशांच्या हव्यासापोटी एका सुरक्षा रक्षकाने सोनसाखळी चोरीचा मार्ग स्वीकारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चिश्तिया चौक ते जयभवानीनगर चौक परिसरात अवघ्या काही तासांत तीन ठिकाणी सोन्याचे दागिने लंपास केल्यानंतर चौथ्या चोरीच्या प्रयत्नात आरोपी नागरिकांच्या तावडीत सापडला. संतप्त नागरिकांनी त्याला पकडून चांगलाच चोप दिल्यानंतर पोलिसांच्या स्वाधीन केले.
मंगळवारी (७ जुलै) सायंकाळी ७ ते ९ वाजेदरम्यान या घटना घडल्या. अजय शिवाजी शिरसाठ (वय ३०, रा. रामपूर, वरुड काजी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र मुंढे यांनी याबाबत माहिती दिली.
पहिल्या घटनेत चिश्तिया चौक ते एमजीएम रुग्णालय मार्गावर एका महिलेची बॅग हिसकावण्यात आली. या बॅगेत सुमारे पाच ग्रॅमची सोन्याची चेन, चार बँकांची एटीएम कार्डे आणि दोन हजार रुपयांची रोकड होती. त्यानंतर राज पेट्रोल पंप परिसरात चार ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरट्याने पळवले. तिसऱ्या घटनेत कामगार चौक येथील एमआयटी रुग्णालयासमोर एका महिलेच्या गळ्यातील १० ते ११ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र हिसकावण्यात आले.
मात्र, संत रविदास चौक परिसरात चौथ्या चोरीचा प्रयत्न करत असताना नागरिकांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले आणि पोलिसांच्या हवाली केले. पोलिस चौकशीत आरोपी हा एका खासगी कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असल्याचे समोर आले. तो विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. आर्थिक अडचणी आणि दारूच्या व्यसनामुळे त्याने गुन्हेगारीचा मार्ग स्वीकारल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास हेडकॉन्स्टेबल संदीप बीडकर करत आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/C3CCRbqDXDA2dKhWRQo4YD?s=cl&p=a&ilr=2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*