छत्रपती संभाजीनगर : शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने मिटमिटा परिसरात मोठी कारवाई करत ५ कोटी २६ लाख २९ हजार ५६० रुपयांची बेहिशोबी रोख रक्कम आणि शस्त्रसाठ्यासह एकूण ५ कोटी ६३ लाख ३७ हजार ९९४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
गुन्हे शाखेला १० जुलै रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास मिटमिटा परिसरातील एका घरात मोठ्या प्रमाणात बेहिशोबी रोकड व शस्त्रसाठा असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. झडतीदरम्यान मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, दागिने आणि विविध प्रकारची शस्त्रे आढळून आली.
कारवाईत ₹५,२६,२९,५६० इतकी रोख रक्कम, १५१.३३ ग्रॅम वजनाचे ₹२१,३४,३५० किमतीचे सोन्याचे दागिने तसेच ३.९ किलो वजनाचे ₹८,०९,२४८ किमतीचे चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. याशिवाय विविध कंपन्यांच्या ४५ मद्याच्या बाटल्या देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.
पोलिसांनी दोन पिस्तुले, एक रायफल, दोन एअर गन, एक तलवार तसेच विविध प्रकारचे १७ चाकू आणि तीन गुप्त्या असा शस्त्रसाठा जप्त केला आहे. तसेच १२ बोरची ६३२ जिवंत काडतुसे, ७.६५ एमएमची १,८७८ काडतुसे आणि .२२ कॅलिबरची ३,८४० काडतुसे असा एकूण ६,३५० जिवंत काडतुसांचा साठा देखील आढळून आला आहे. जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांपैकी काही शस्त्रांना परवाने असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
ही कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण पवार, पोलिस उपआयुक्त (गुन्हे) आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने केली. जप्त करण्यात आलेल्या बेहिशोबी मालमत्तेबाबत आयकर विभागालाही माहिती देण्यात येणार असून, या प्रकरणाचा पुढील तपास छावणी पोलिस ठाणे करीत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/C3CCRbqDXDA2dKhWRQo4YD?s=cl&p=a&ilr=2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*