छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिकेच्या वतीने मुकुंदवाडीतील स्वराजनगर परिसरात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामादरम्यान झालेल्या दुर्दैवी अपघातात ५५ वर्षीय किराणा दुकानदाराचा मृत्यू झाला. कंत्राटदार आणि जेसीबी चालकाच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप करण्यात आला असून, याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय पंढरीनाथ चौधरी (वय ५५, रा. स्वराजनगर, हनुमान मंदिराजवळ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. रविवारी (दि. १२) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या दुकानासमोरच रस्त्याचे काम सुरू होते. जेसीबीद्वारे खोदकाम सुरू असताना रस्त्यालगत असलेले झाड तुटत असल्याचे लक्षात आल्याने संजय चौधरी हे जेसीबी चालकाला सावध करण्यासाठी त्याच्याजवळ गेले. मात्र, मशीनच्या मोठ्या आवाजामुळे चालकाला त्यांचा इशारा ऐकू आला नाही.
याचवेळी चालकाने जेसीबी वळवल्याने त्यावरील लोखंडी फावडे थेट संजय चौधरी यांच्या डाव्या पायावर जोरात आदळले. या धडकेत त्यांच्या पायाला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. शेजारी राहणारे रवी पेरे यांनी तातडीने त्यांच्या मुलगा दत्ता चौधरी यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर संजय चौधरी यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी दुपारी १.५५ वाजता त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी मृताचे पुत्र दत्ता चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जेसीबी चालक अनिल लक्ष्मण राठोड (वय ४६, रा. कामगार गल्ली, चिकलठाणा) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, अपघातानंतर आरोपीने पोलिसांना सुरुवातीला खोटे नाव सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. चौकशीत संशय निर्माण झाल्यानंतर त्याने आपले खरे नाव उघड केले.
दरम्यान, स्थानिक नागरिकांनी रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी कोणतीही सुरक्षितता व्यवस्था नसल्याचा आरोप केला आहे. गेल्या पाच वर्षांपासून रखडलेल्या या कामाला नुकतीच सुरुवात झाली होती. मात्र, सुरक्षेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष झाल्याने एका निष्पाप नागरिकाचा जीव गेल्याची भावना परिसरातून व्यक्त होत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/C3CCRbqDXDA2dKhWRQo4YD?s=cl&p=a&ilr=2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*