छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) सुरू असलेल्या धडक कारवाईदरम्यान फुलंब्री तालुक्यातील दूध व्यवसायातील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. फुलंब्री येथील सिद्धेश्वर दूध डेअरीवर एफडीएच्या पथकाने टाकलेल्या धाडीत तब्बल ३ हजार ५०० लिटर संशयित दूध आणि त्यात भेसळ करण्यासाठी वापरली जाणारी गोवर्धन दूध पावडर जप्त करण्यात आली.
जप्त करण्यात आलेल्या संशयित दुधाची किंमत सुमारे १ लाख ३२ हजार रुपये इतकी असून हे दूध जागेवरच नष्ट करण्यात आले. या कारवाईनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तपासादरम्यान सिद्धेश्वर दूध डेअरीमधील हे दूध फुलंब्रीतील शिवकृपा दूध डेअरीला पुरवले जात असल्याचे उघड झाले. त्यानंतर एफडीएच्या अधिकाऱ्यांनी शिवकृपा डेअरीवरही कारवाई केली असता तेथेही गंभीर त्रुटी आणि नियमांचे उल्लंघन आढळून आले.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सिद्धेश्वर आणि शिवकृपा या दोन्ही डेअरींना टाळे ठोकले आहे. प्राथमिक तपासात शिवकृपा डेअरीमधून हे दूध मराठवाडा मिल्क प्रोड्युसर कंपनी (केअर ऑफ एम/एस सोनाई डेअरी, इंदापूर) तसेच गुजरातमधील पंचमहल दूध उत्पादक सहकारी संघ यांना पुरवले जात असल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी संबंधितांविरुद्ध फुलंब्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एफडीए आणि पोलिस प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे. सदर कारवाई सहआयुक्त एस. आर. करकले आणि सहायक आयुक्त दयानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत अजिंठेकर, फरीद सिद्दीकी आणि प्रज्ञा सुरसे यांनी पार पाडली.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/C3CCRbqDXDA2dKhWRQo4YD?s=cl&p=a&ilr=2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*