छत्रपती संभाजीनगर : शहरात कालपासून अनेक पेट्रोल पंपांवर वाहनधारकांची मोठी गर्दी उसळल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शहरातील प्रमुख चौकांजवळील तसेच उपनगरांतील पंपांवर पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. काही ठिकाणी वाहनांच्या रांगा रस्त्यावरपर्यंत पोहोचल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला.
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढण्याची शक्यता आहे, तसेच इंधनाचा तुटवडा निर्माण होऊ शकतो, अशा स्वरूपाच्या अफवा सोशल मीडियावर वेगाने पसरल्या. या चर्चेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. परिणामी, अनेकांनी खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या वाहनांची टाकी पूर्ण भरून घेण्यास प्राधान्य दिले. सामान्यतः १०० ते २०० रुपयांचे पेट्रोल भरणारे दुचाकीस्वारही टाकी फुल करताना दिसून आले.
दरम्यान, पेट्रोल-डिझेल डीलर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी शहरात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले आहे. कोणत्याही प्रकारचा तुटवडा नसून नियमित पुरवठा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले आहे.
प्रशासनाकडूनही नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अनावश्यक गर्दीमुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशीही सूचना देण्यात आली आहे. नागरिकांनी अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा आणि सोशल मीडियावरील अप्रमाणित संदेश पुढे पाठवू नयेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IdBhTvB8DI79n97XfExNI9?mode=gi_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*