छत्रपती संभाजीनगर महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा उद्या, दि. ५ मार्च रोजी सकाळी ११:३० वाजता महापालिका मुख्यालयात आयोजित करण्यात आली आहे. या सभेत स्थायी समितीच्या १६ सदस्यांची निवड करण्यात येणार असून, शहराच्या राजकीय वर्तुळात या बैठकीकडे मोठे लक्ष लागले आहे. महापालिकेतील तौलनिक संख्याबळानुसार सदस्यांची निवड होणार असल्याने विविध पक्षांकडून तयारी सुरू आहे.

महापालिकेत सध्या भाजपचे ३३, एमआयएमचे १३, शिंदेसेनेचे ६, उद्धवसेनेचे ४, वंचित बहुजन आघाडीचे ४, काँग्रेसचा १ आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) चा १ असा एकूण ५७ नगरसेवकांचा आकडा आहे. या संख्याबळाच्या आधारे स्थायी समितीवर भाजपचे ८, एमआयएमचे ४, शिंदेसेना २, उद्धवसेना १ आणि लोकसेवा विकास आघाडी (वंचित व काँग्रेस) १ सदस्य अशी विभागणी अपेक्षित आहे. सभेदरम्यान प्रत्येक पक्षाचे गटनेते आपापल्या सदस्यांची नावे महापौरांकडे सादर करतील. त्यानंतर महापौरांकडून १६ सदस्यांच्या नावांची अधिकृत घोषणा केली जाईल.

स्थायी समितीची निवड पूर्ण झाल्यानंतर विषय समित्यांसाठी सदस्यांची निवड केली जाणार आहे. महिला व बालकल्याण, शहर सुधार, शिक्षण, आरोग्य आणि समाजकल्याण या पाच समित्यांसाठी प्रत्येकी ९ सदस्यांची नियुक्ती केली जाईल. प्रत्येक समितीत भाजपचे ४, एमआयएमचे ३, शिंदेसेना १ आणि उद्धवसेना १ असे एकूण ९ सदस्य असतील.

या निवड प्रक्रियेनंतर महापालिकेतील सत्तासमीकरण अधिक स्पष्ट होणार असून, आगामी निर्णयप्रक्रियेत स्थायी व विषय समित्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे उद्याच्या सभेकडे सर्व पक्षांचे आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IdBhTvB8DI79n97XfExNI9?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

494 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क