छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर पोखरी शिवारातील एका पेट्रोल पंपासमोर ट्रक चालकाला मारहाण करून मोबाईल हिसकावण्याचा आणि डिझेल चोरीचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा फुलंब्री पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ५ मार्च रोजी पहाटे विशेष कारवाई करत पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून, दोन आरोपी फरार झाले आहेत. या घटनेमुळे समृद्धी महामार्ग परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलाद्दीन अलाउद्दीन साह (वय ४५, रा. पालघर) हे आपल्या MH-18-BA-0035 क्रमांकाच्या ट्रकने जालनाकडून मुंबईकडे माल घेऊन जात होते. बुधवारी रात्री सुमारे १०:३० वाजता त्यांनी पोखरी शिवारात टायरमधील हवा तपासण्यासाठी ट्रक थांबवला. त्याच वेळी सहा इसमांनी त्यांना गाठत शिवीगाळ करून मारहाण केली. या मारहाणीत आरोपींनी त्यांचा सुमारे २० हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून घेतला. तसेच ट्रकमधील डिझेल चोरी करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, ट्रकच्या क्लिनरने आरडाओरड केल्याने पेट्रोल पंपावरील नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली. नागरिकांच्या सतर्कतेमुळे राजू खंडाळे, अभिषेक पवार, प्रशांत गायकवाड आणि कृष्णा आगळे या चार आरोपींना पकडण्यात यश आले. मात्र विजय पवार आणि राहुल मुदगळ हे दोघे मोबाईल घेऊन फरार झाले.

घटनेची माहिती मिळताच फुलंब्री पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींची MH-19-CY-5264 क्रमांकाची पिकअप जप्त केली. वाहनातून डिझेल भरण्यासाठी वापरले जाणारे सहा कॅन, प्लास्टिक पाईप, कोयता आणि लोखंडी पाईप असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१०(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे पुढील तपास करीत आहेत. फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IdBhTvB8DI79n97XfExNI9?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

812 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क