पैठण : संत एकनाथ महाराजांच्या स्मृतिप्रीत्यर्थ साजऱ्या होणाऱ्या नाथषष्ठी उत्सवाला पैठणमध्ये गुरुवारी उत्साहात सुरुवात झाली. नाथांच्या वाड्यातील ऐतिहासिक रांजण भरण्याच्या परंपरेचा प्रारंभ झाला असून नाथ वंशजांच्या हस्ते गोदावरीचे पाणी रांजणात टाकण्याचा विधी पार पडला. या विधीनंतर आता हा रांजण नेमका कोणाच्या हातून भरतो आणि यंदाचा ‘श्रीखंड्या’ कोण ठरणार, याकडे भाविकांचे लक्ष लागले आहे. उत्सवाच्या पहिल्याच दिवशी रांजणात सुमारे १०० घागरी पाणी टाकण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

नाथषष्ठी हा संत एकनाथ महाराजांनी घेतलेल्या जलसमाधीचा स्मृतिदिन म्हणून दरवर्षी पैठणमध्ये मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. या उत्सवासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक पैठणमध्ये दाखल होतात. दरवर्षी साधारणपणे पाच ते सात लाख भाविक या सोहळ्यात सहभागी होतात.

नाथांच्या वाड्यातील रांजणाची पूजा चंद्रशेखर उपाध्याय आणि रवींद्र साळजोशी यांच्या मंत्रोच्चारात करण्यात आली. यावेळी पूजा मानकरी रघुनाथ बुवा गोसावी, रावसाहेब महाराज गोसावी, सुप्रिया गोसावी आणि उल्काताई पालखीवाले यांच्या हस्ते रांजणात गोदावरीचे पाणी टाकण्यात आले.

नाथांच्या वाड्यातील हा रांजण पूर्ण काळ्या पाषाणातून तयार करण्यात आला असून तो सुमारे २१ फूट खोल आणि दीड फूट रुंद आहे. या रांजणात जवळपास २१ हजार लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. विशेष म्हणजे या रांजणातून थेंबथेंब पाणी झिरपत गोदावरीत मिसळते, अशी श्रद्धा आहे.

आख्यायिकेनुसार साक्षात पांडुरंग ‘श्रीखंड्या’ या रूपात नाथांच्या घरी आले होते आणि त्यांनी तब्बल १२ वर्षे कावडीने गोदावरीचे पाणी आणून हा रांजण भरला होता. या घटनेला सुमारे पावणेपाचशे वर्षांचा इतिहास आहे.

दरम्यान, नाथषष्ठीच्या मुख्य सोहळ्यास ९ मार्चपासून प्रारंभ होणार असून त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून वारकऱ्यांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती मुख्याधिकारी पल्लवी अंभोरे आणि नगराध्यक्षा विद्या कावसानकर यांनी दिली.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IdBhTvB8DI79n97XfExNI9?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

343 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क