छत्रपती संभाजीनगर : खेळताना झालेल्या एका दुर्दैवी अपघातात पाच वर्षीय चिमुकलीच्या डोळ्यात पेन्सिलचे टोक घुसून तिच्या कॉर्नियाला (बाह्य नेत्रपटल) गंभीर दुखापत झाली होती. मात्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथील नेत्रशल्य चिकित्सा विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांनी अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडत चिमुकलीची दृष्टी वाचवण्यात मोठे यश मिळवले.
मुलीची आई दीपाली कुंभकर्ण यांनी सांगितले की, मुलगी घरी खेळत असताना अचानक पेन्सिल तिच्या डोळ्यात घुसली. त्यामुळे तिला तीव्र वेदना सुरू झाल्या. सुरुवातीला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, शस्त्रक्रियेतील संभाव्य गुंतागुंत आणि मोठा आर्थिक खर्च लक्षात घेऊन पुढील उपचारांसाठी तिला घाटी रुग्णालयात हलविण्यात आले.
घाटी रुग्णालयात डॉक्टरांनी तातडीने तपासणी करून सुमारे तीन तासांची अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली. विशेष म्हणजे या संपूर्ण उपचारासाठी कोणताही खर्च झाला नाही. शस्त्रक्रियेनंतर मुलीची प्रकृती स्थिर असून तिची दृष्टी सुरक्षित राहिल्याने कुटुंबीयांनी डॉक्टरांचे आभार मानले.
ही शस्त्रक्रिया नेत्रशल्य चिकित्सा विभागाच्या प्रमुख डॉ. अर्चना वरे यांच्या नेतृत्वाखाली डॉ. महेश सोनपेठकर, डॉ. वेणुगोपाल रांगू आणि डॉ. तपन जक्कल यांनी केली. तसेच बधिरीकरणशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. गायत्री तडवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. प्रेरणा शिंदे व त्यांच्या पथकाने मोलाचे सहकार्य केले. वरिष्ठ निवासी डॉ. मोहन मोरखडे, डॉ. इमाद ख्वाजा आणि डॉ. मधुश्री तोरसकर यांनीही शस्त्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावली.
दरम्यान, डॉ. अर्चना वरे यांनी पालकांना आवाहन करताना सांगितले की, लहान मुलांच्या हातात पेन्सिल, पेन, कात्री किंवा इतर टोकदार वस्तू देताना विशेष काळजी घ्यावी. डोळ्याला कोणतीही दुखापत झाल्यास वेळ न दवडता तातडीने नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. योग्य वेळी उपचार मिळाल्यास गंभीर दुखापतीतही दृष्टी वाचवणे शक्य होते.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/KYaIrqX6xIM3SpZ1FYjFWw?s=cl&p=a&ilr=0
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*