छत्रपती संभाजीनगर : शहराला नशामुक्त करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि सारा नवजीवन बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी शहागंज परिसरात भव्य जनजागृती अभियान राबविण्यात आले. या उपक्रमात तब्बल दोन हजार शालेय विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत मानवी साखळी आणि रॅलीद्वारे व्यसनमुक्तीचा संदेश दिला.
यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी विद्यार्थ्यांना नशामुक्त जीवन जगण्याचा संकल्प करण्याचे आवाहन करत, व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याची गरज असल्याचे सांगितले. “नशा छोडो, परिवार जोडो – नशा छोडो, भारत जोडो” या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. विशेष म्हणजे, सुमारे ५०० विद्यार्थ्यांनी ‘नशामुक्त छत्रपती संभाजीनगर’ ही आकर्षक मानवी रांगोळी साकारली असून तिचे ड्रोनद्वारे चित्रिकरण करण्यात आले.
या अभियानात समाज कल्याण विभाग, जिल्हा आरोग्य विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग, पोलीस प्रशासन, महानगरपालिका तसेच विविध शासकीय विभागांनी सक्रिय सहभाग नोंदविला. जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती पी. एम. मिन्नू यांच्या हस्ते जनजागृती रॅलीला हिरवा झेंडा दाखविण्यात आला.
कार्यक्रमाला शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर, उपशिक्षणाधिकारी दिपाली थावरे, निता श्रीश्रीमाळ, गीता तांदळे, विस्तार अधिकारी दिलीप सिरसाठ, जालम चौरे, सुनिता वाघ, ज्ञानेश्वर रोडगे यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. नशामुक्त भारत अभियानाचे मास्टर ट्रेनर डॉ. कृष्णा रामचंद्र भावले यांनी विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना व्यसनमुक्तीची शपथ दिली.
राष्ट्रीय हिंदी महाविद्यालय, डॉ. झाकीर हुसेन कनिष्ठ महाविद्यालय, सर सय्यद महाविद्यालय, भारतीय विद्या मंदिर, पी. यू. जैन माध्यमिक विद्यालय तसेच शहरातील विविध मराठी, उर्दू आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी या उपक्रमात सहभाग घेतला. सूत्रसंचालन शेख रशीद रहीमान यांनी केले, तर भाऊ पठाडे यांनी आभार मानले.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/KYaIrqX6xIM3SpZ1FYjFWw?s=cl&p=a&ilr=0
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*