छत्रपती संभाजीनगर : शहरातील रोजाबाग परिसरात शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका २१ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्रांनी वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जुन्या वादाचा कायमचा तोडगा काढण्याच्या बहाण्याने संबंधित तरुणाला बोलावून त्याच्यावर नियोजनबद्ध हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

खान नासिर खान तारेख अहमद (वय २१, रा. शाह बाजार) असे मृत तरुणाचे नाव आहे. नासिर याचे काही स्थानिक तरुणांसोबत किरकोळ कारणांवरून पूर्वीपासून वाद सुरू होते. हेच वैर मनात ठेवून विरोधी गटाने त्याला रोजाबाग परिसरात चर्चेसाठी बोलावले. मात्र, तेथे आधीच दबा धरून बसलेल्या आरोपींनी त्याच्यावर अचानक हल्ला चढवला.

माहितीनुसार, सुमारे आठ जणांच्या टोळक्याने नासिरला चारही बाजूंनी घेरले. सुरुवातीला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण करून त्याला खाली पाडण्यात आले. त्यानंतर आरोपींनी धारदार चाकूने त्याच्यावर सपासप वार केले. गंभीर जखमी झालेला नासिर रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच सिटी चौक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पोलिसांनी अवघ्या काही तासांत हत्येत सहभागी असलेल्या आठ आरोपींपैकी सात जणांना ताब्यात घेतले असून एका फरार आरोपीचा शोध सुरू आहे.

दरम्यान, या हत्याकांडामागे शहरातील एका माजी नगरसेवकाच्या मुलाचा मुख्य हात असल्याचा गंभीर आरोप मयत नासिरच्या भावाने केला आहे. या आरोपामुळे प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास केला जात आहे. अटकेत असलेल्या संशयितांची कसून चौकशी सुरू असून हत्येचे नेमके कारण, कटाचा सूत्रधार आणि इतर संबंधित बाबींचा तपास सुरू आहे.

या घटनेनंतर रोजाबाग आणि शाह बाजार परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/C3CCRbqDXDA2dKhWRQo4YD?s=cl&p=a&ilr=2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,175 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क