छत्रपती संभाजीनगर : केवळ ७ लाख रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका सायबर भामट्याने वृद्ध व्यावसायिकाची तब्बल ₹१५ लाख २५ हजार ४०० रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात सूरज श्यामनारायण विश्वकर्मा याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुकुंद मधुकर अत्रे (रा. साईकृपा रेसिडेन्सी, संत एकनाथ रंगमंदिरामागे, उस्मानपुरा) हे रुग्णालयातील ऑपरेशन थिएटर डिझाइन व इन्स्टॉलेशनचा व्यवसाय करतात. १७ सप्टेंबर २०२४ रोजी त्यांना सूरज विश्वकर्मा याने फोन करून ७ लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी सुरुवातीला ‘प्रोसेसिंग फी’ म्हणून ₹१,९९९ भरण्याची अट घालण्यात आली. अत्रे यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून यूपीआयद्वारे पैसे पाठवले.
त्यानंतर आरोपीने कर्जाची फाईल तातडीने मंजूर करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाखाली विविध शुल्क, प्रक्रिया खर्च, कागदपत्र पडताळणी, विमा व इतर कारणे सांगत वेळोवेळी पैशांची मागणी केली. प्रत्येक वेळी ‘लोन लवकरच मंजूर होईल’ असे सांगून त्याने अत्रे यांचा विश्वास कायम ठेवला.
धक्कादायक बाब म्हणजे, १७ सप्टेंबर २०२४ ते २७ जुलै २०२६ या जवळपास पावणेदोन वर्षांच्या कालावधीत आरोपीने अत्रे यांच्याकडून तब्बल ३५० वेळा ऑनलाइन व्यवहार करून घेतले. या व्यवहारांमधून त्याने एकूण ₹१५ लाख २५ हजार ४०० रुपये उकळल्याचे तपासात समोर आले आहे. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अत्रे यांनी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
या प्रकरणी पोलिसांनी सूरज श्यामनारायण विश्वकर्मा याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला असून पोलिस निरीक्षक संग्राम ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. नागरिकांनी कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या आमिषाला बळी न पडता कर्ज किंवा आर्थिक व्यवहार करताना संबंधित संस्थेची खातरजमा करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/KYaIrqX6xIM3SpZ1FYjFWw?s=cl&p=a&ilr=0
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*