छत्रपती संभाजीनगर : जमीन व्यवहारात तब्बल १ कोटी ३३ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार करणाऱ्या ६० वर्षीय निवृत्त फौजदाराकडून आरोपीला अटक करण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेतील पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे (३८, रा. सातारा परिसर) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. कामठेने तक्रारदाराकडे लाच मागितल्याचे पुरावे मिळाल्यानंतर एसीबीने ही कारवाई केली.
तक्रारदार निवृत्त फौजदार राष्ट्रपती पदक विजेते असून, त्यांना शहरातील मोक्याची १८.७ गुंठे जमीन दोन कोटी रुपयांत विक्री करण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. मुख्य आरोपी शेख इरफान शेख शफीक याच्यासह इतरांनी त्यांच्याकडून तब्बल १ कोटी ३३ लाख रुपये घेतले. मात्र, पैसे घेतल्यानंतरही जमिनीचे खरेदीखत करून देण्यात आले नाही. तसेच दिलेले बँक धनादेशही बंद खात्यांचे निघाले.
जमिनीचा ताबा मागण्यासाठी गेल्यानंतर आरोपीच्या वडिलांनी कंबरेतील बंदूक काढून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही निवृत्त फौजदाराने केला आहे. याप्रकरणी त्यांनी पोलिस आयुक्तालयात तक्रार अर्ज केला होता.
वरिष्ठांच्या चौकशीनंतर फेब्रुवारीत गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. त्यावेळी अर्जाची चौकशी करणाऱ्या उपनिरीक्षक कामठेने आरोपींना अटक करण्यासाठी ‘बक्षीस’ म्हणून ५० हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली.
एसीबीने तक्रारीची पडताळणी केली असता कामठे लाच मागत असल्याचे निष्पन्न झाले. मार्चच्या सुरुवातीला त्याच्याकडून तपास काढून घेण्यात आला. त्यानंतरही त्याने तक्रारदाराकडे लाचेची मागणी केल्याचे पुरावे एसीबीला मिळाले. सापळ्याची चाहूल लागल्याने कामठेने तक्रारदाराला भेटणे टाळले. अखेर लाच मागितल्याच्या पुराव्यांच्या आधारे एसीबीने सोमवारी त्याला अटक केली.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/KYaIrqX6xIM3SpZ1FYjFWw?s=cl&p=a&ilr=0
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*