छत्रपती संभाजीनगर : “आजी, तुम्हाला लॉटरी लागली आहे. चला, मी तुम्हाला पैसे काढून देतो,” असे गोड बोलून एका भामट्याने ६८ वर्षीय वृद्धेला फसवून त्यांच्या हातातील सुमारे तीन तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या लंपास केल्याची घटना शहरातील हर्सूल परिसरात घडली. या प्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमल सुखदेव शिंदे (वय ६८, रा. शिवेश्वर कॉलनी, भगतसिंगनगर) या २६ जुलै रोजी दुपारी गावाहून छत्रपती संभाजीनगर येथे परतल्या होत्या. हर्सूल टी-पॉइंटवर उतरून त्या पायी घराकडे जात असताना एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्याशी संवाद साधला. “तुम्हाला लॉटरी लागली आहे,” असे सांगून त्याने त्यांचा विश्वास संपादन केला.

कमल शिंदे यांनी आपण कोणतीही लॉटरी घेतलेली नसल्याचे सांगत मुलाला बोलावते, असे म्हटले. मात्र, “माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुम्हाला पैसे मिळवून देतो,” असे सांगत त्या व्यक्तीने त्यांना आपल्या दुचाकीवर बसवून राजधानी हॉटेल परिसरात नेले.

तेथे पोहोचल्यानंतर “याच ठिकाणी लॉटरीचे पैसे मिळतील. साहेबांना तुमच्या बांगड्या दाखवायच्या आहेत, त्यामुळे त्या काढून माझ्याकडे द्या,” असे सांगून त्याने कमल शिंदे यांना भुरळ घातली. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्यांनी हातातील सोन्याच्या बांगड्या काढून त्याच्या ताब्यात दिल्या. बांगड्या हातात मिळताच आरोपीने क्षणार्धात तेथून पलायन केले.

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कमल शिंदे यांनी हर्सूल पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेण्याचे काम पोलिसांनी सुरू केले असून नागरिकांनी अनोळखी व्यक्तींच्या आमिषांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KYaIrqX6xIM3SpZ1FYjFWw?s=cl&p=a&ilr=0

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

691 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क