छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे परिचारिकांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला असून, त्याचा परिणाम पहिल्याच दिवशी रुग्णसेवेवर मोठ्या प्रमाणात दिसून आला. सुमारे पाचशेहून अधिक परिचारिका या संपात सहभागी झाल्याने रुग्णालयातील दैनंदिन कामकाज ठप्प झाले आहे.
मराठवाड्यातील सर्वात मोठे शासकीय रुग्णालय असलेल्या घाटीत दररोज हजारो रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र, संपामुळे वॉर्डामध्ये औषधोपचार देणारे तसेच रुग्णांची देखभाल करणारे कर्मचारी उपलब्ध नसल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी रुग्णसेवा विस्कळीत झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
दरम्यान, रुग्णालय प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी इतर विभागांतील परिचारिकांना तात्पुरते कामावर बोलावले आहे. तसेच नर्सिंग कॉलेज आणि खाजगी नर्सिंग संस्थांमधूनही परिचारिकांची मदत घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी विविध विभागांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि सेवा सुरळीत ठेवण्याचे निर्देश दिले.
परिचारिकांच्या प्रमुख मागण्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करणे, रिक्त पदांची तातडीने भरती करणे, कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवा देणे, तसेच पदोन्नती आणि भत्ते यांची अंमलबजावणी करणे यांचा समावेश आहे. याशिवाय, कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी करणे आणि सुरक्षेसाठी कठोर कायदेशीर तरतुदी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या संपावर तोडगा काढण्यासाठी प्रशासन आणि संघटना यांच्यात चर्चा सुरू असून, लवकरच सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IFiUHSaNdeRHc992rS9iqG?mode=gi_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*