बजाजनगर : चारा-वैरण करत असताना उधळलेल्या बैलजोडीतील एक बैल थेट विहिरीत कोसळल्याची थरारक घटना वाळूज औद्योगिक क्षेत्रातील कमळापूर-भुजंगवस्ती शिवारात रविवारी (दि.१९) रात्री सुमारे ८ वाजता घडली. या घटनेत शेतकरी व स्थानिक युवकांनी धाडस दाखवत बैलाला वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. अखेर वाळूज अग्निशमन विभागाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बैलाला सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळवले.

शेतकरी महेंद्र भुजंग (रा. भुजंगवस्ती) हे आपल्या शेतात बैलजोडीला चारा घालत असताना अचानक बैलजोडी उधळली. या गोंधळात एक बैल नियंत्रणाबाहेर जाऊन थेट विहिरीत पडला. अंधाराचे वातावरण असल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली. शेतकरी भुजंग यांनी तात्काळ आरडाओरडा करत मदत मागितली. त्यावर सहकारी परमेश्वर राऊत व इतर युवकांनी धाव घेत बैलाला बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र कमकुवत रस्सीमुळे त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले.

दरम्यान, काही धाडसी युवकांनी विहिरीत उतरून बैलाला पाण्यात बुडू न देण्यासाठी प्रयत्न केले. परिस्थिती गंभीर होत असल्याने अग्निशमन विभागाला कळविण्यात आले. माहिती मिळताच उपअग्निशमन अधिकारी अनिल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

अग्निशमन दलाने साखळदंड व मजबूत दोराच्या साहाय्याने बचावकार्य सुरू केले. तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर रात्री १० वाजेच्या सुमारास बैलाला विहिरीतून सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. या यशस्वी रेस्क्यूमुळे शेतकरी व नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील शेकडो नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. बैल बाहेर येताच सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटात अग्निशमन दलाचे कौतुक केले.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IFiUHSaNdeRHc992rS9iqG?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

546 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क