छत्रपती संभाजीनगर : रक्षाबंधन सणानिमित्त प्रवाशांची वाढणारी गर्दी लक्षात घेऊन छत्रपती संभाजीनगर एसटी विभागाने तब्बल ११५ जादा बसगाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. पुणे, जळगाव, नाशिक, बीड, सोलापूर आणि धुळे या प्रमुख मार्गांवर प्रवाशांची मागणी आणि गर्दीनुसार जादा बस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे सणासुदीच्या काळात प्रवाशांची गैरसोय टाळण्यास मदत होणार आहे.
रक्षाबंधनासाठी विविध शहरांमध्ये राहणारे नागरिक मोठ्या संख्येने आपल्या गावी ये-जा करतात. परिणामी एसटी बसस्थानकांवर तसेच प्रमुख मार्गांवर मोठी गर्दी होते. ऐनवेळी बसची कमतरता निर्माण झाल्यास प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. विशेषतः महिला प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी एसटी प्रशासनाने यंदा आगाऊ नियोजन केले आहे.
पुणे आणि नाशिक मार्गांवर रक्षाबंधनाच्या काळात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मार्गांवर प्रवास करणाऱ्या नागरिकांनी शक्यतो आगाऊ आरक्षण करूनच प्रवास करावा, असे आवाहन एसटी विभागाने केले आहे. आरक्षणामुळे प्रवाशांना निश्चित जागा मिळण्यास मदत होणार असून, प्रवाशांच्या संख्येनुसार बसगाड्यांचे नियोजन करणे प्रशासनालाही सुलभ होणार आहे.
गैरसोय टाळण्यावर भर
सणासुदीच्या काळात प्रवाशांची संख्या अचानक वाढल्यास अतिरिक्त बस सोडण्यासाठी एसटी प्रशासनाची धावपळ होते. मात्र, यंदा आधीच ११५ जादा बसगाड्यांचे नियोजन करण्यात आल्याने गर्दीच्या मार्गांवर गरजेनुसार अतिरिक्त बस उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे. प्रवाशांना सुरक्षित, सुरळीत आणि वेळेत प्रवासाची सुविधा देण्यावर विभागाचा भर आहे.
“रक्षाबंधनासाठी विभागात जवळपास ११५ जादा बसगाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. पुणे आणि नाशिककडे मोठी गर्दी असते. त्यामुळे प्रवाशांनी आधीच आरक्षण करून घ्यावे. त्यातून एसटीलाही बसगाड्यांचे योग्य नियोजन करता येईल. प्रवाशांची गैरसोय होणार नाही, याची आम्ही काळजी घेणार आहोत,” असे विभाग नियंत्रक प्रमोद मेहूल यांनी सांगितले.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/KYaIrqX6xIM3SpZ1FYjFWw?s=cl&p=a&ilr=0
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*