छत्रपती संभाजीनगर : शहरात एकीकडे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी तब्बल ८ ते १० दिवस प्रतीक्षा करावी लागत असताना दुसरीकडे पिण्याच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असल्याचे चित्र आहे. पाण्याच्या टाक्या भरल्यानंतरही नळ सुरू ठेवणे, घरासमोरील परिसर धुणे, वाहने धुणे तसेच पाइपलाइनमधील गळतीकडे दुर्लक्ष करण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. अशा प्रकारांवर आता महापालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे.
शुक्रवारी (२१ ऑगस्ट) सकाळी मनपा आयुक्त अमोल येडगे आणि घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख नंदकिशोर भोंबे हे पैठण गेट परिसरातून जात असताना त्यांना एका घरातून मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर वाहत असल्याचे निदर्शनास आले. नीलेश देशमुख यांच्या घरातील पाण्याची टाकी भरल्यानंतरही नळ बंद करण्यात आला नव्हता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पिण्याचे पाणी गटारीत आणि रस्त्यावर वाहून जात होते.
या प्रकाराची गंभीर दखल घेत आयुक्त अमोल येडगे यांनी संबंधित नागरिकावर १० हजार रुपयांचा दंड आकारण्याचे निर्देश दिले. पाण्याची सद्यःस्थिती पाहता अशा प्रकारे पाण्याचा अपव्यय करणे संतापजनक असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.
सध्या पावसाळ्यातही शहरातील अनेक भागांत ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा होत आहे. त्यातच पाइपलाइन फुटणे किंवा तांत्रिक अडचणींमुळे अनेकदा पाणीपुरवठा विस्कळीत होतो. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी महापालिकेने आता कठोर भूमिका घेतली आहे.
या प्रकारांवर राहणार करडी नजर
पाण्याची टाकी भरल्यानंतर ओव्हरफ्लो होणे, रस्ते व परिसर धुण्यासाठी पिण्याचे पाणी वापरणे, कार-दुचाकी धुणे, घरातील पाइपलाइन किंवा नळाची गळती दुरुस्त न करणे आणि सार्वजनिक नळ सुरू ठेवणे, अशा प्रकारांवर महापालिकेची नजर राहणार आहे.
“नागरिकांनी पाण्याचा प्रत्येक थेंब जबाबदारीने वापरावा. यापुढे पाण्याचा अपव्यय करणारा प्रकार आढळल्यास कोणतीही गय केली जाणार नाही,” असा इशारा मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी दिला आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/KYaIrqX6xIM3SpZ1FYjFWw?s=cl&p=a&ilr=0
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*