छत्रपती संभाजीनगर : कर्णपूरा यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तयारीला वेग दिला असून, यंदा तब्बल ८ ते १० लाख भाविक येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी लक्षात घेता सुरक्षा, वाहतूक, पाणी, आरोग्य आणि स्वच्छतेच्या व्यवस्थेचे काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी दिल्या.
यात्रोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यात्रेच्या काळात विविध विभागांमध्ये समन्वयाचा अभाव राहू नये, यासाठी प्रत्येक यंत्रणेने आपली जबाबदारी स्पष्टपणे निश्चित करून त्यानुसार कार्यवाही करावी, असे निर्देश यावेळी देण्यात आले.
भाविकांची मोठी गर्दी होणार असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहनतळांची योग्य व्यवस्था, वाहतुकीचे नियमन आणि महत्त्वाच्या मार्गांवर दिशादर्शक फलक लावण्यावर भर देण्यात आला आहे. पोलीस बंदोबस्त वाढविण्यासोबतच आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन पथकेही आवश्यक साधनांसह तयार ठेवण्यात येणार आहेत.
यात्रा परिसरातील स्वच्छतेसाठी महापालिकेकडून नियमित साफसफाई आणि घंटागाड्यांची व्यवस्था केली जाणार आहे. भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने वैद्यकीय पथके, औषधसाठा आणि तातडीची उपचार व्यवस्था उपलब्ध ठेवण्याच्या सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत. पाण्याची संभाव्य गरज लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार टँकरचीही व्यवस्था केली जाणार आहे.
यात्रेतील खाद्यपदार्थांच्या विक्रीवरही प्रशासनाचे लक्ष राहणार असून, अन्न व औषध प्रशासनाकडून विक्रेत्यांची तपासणी केली जाणार आहे. अन्न परवाना, स्वच्छता आणि खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत.
दरम्यान, जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेता यात्रेदरम्यान पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भाविकांची सुरक्षितता सर्वोच्च प्राधान्याने ठेवून सर्व विभागांनी परस्पर समन्वय साधावा आणि यात्रा कोणत्याही अडथळ्याविना पार पाडावी, असे जिल्हाधिकारी गौडा यांनी स्पष्ट केले.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CF89MLzjXiJLRGIbwDr7te
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*