छत्रपती संभाजीनगर : दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शहरातील पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. रस्त्यावर पाणी सोडणे आणि नळाला तोटी न लावता पाण्याचा अपव्यय केल्याप्रकरणी आरेफ कॉलनी आणि हिलाल कॉलनी परिसरातील दोन नागरिकांवर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने मंगळवारी (६ ऑक्टोबर) दंडात्मक कारवाई केली. दोघांकडून एकूण १५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी शहरातील उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. पाणी भरल्यानंतर नळ तातडीने बंद करणे, नळाला योग्य तोटी बसवणे तसेच पाणी रस्त्यावर, नालीत किंवा इतर ठिकाणी वाहून जाणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
घरगुती नळ जोडणी, नळाच्या तोट्या तसेच अंतर्गत जलवाहिनीतील गळती किंवा आवश्यक दुरुस्तीची सर्व कामे १५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या मुदतीनंतर पाण्याची गळती किंवा अपव्यय आढळल्यास संबंधितांवर कठोर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. पहिल्या वेळी ५ हजार, दुसऱ्यांदा १० हजार, तर तिसऱ्यांदा तब्बल २५ हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. तिसऱ्यांदा कारवाई झाल्यानंतर संबंधितांविरोधात फौजदारी गुन्हाही दाखल केला जाणार आहे.
दरम्यान, पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी आणि नागरी मित्र पथक मंगळवारी आरेफ कॉलनी व हिलाल कॉलनी परिसरात पाहणी करत होते. त्यावेळी अजहर कादिल हे नळाचे पाणी थेट रस्त्यावर सोडत असल्याचे आढळून आले. त्यांच्यावर १० हजार रुपयांचा दंड करण्यात आला. तसेच शेख अतिक यांच्या नळाला तोटी नसल्याने पाणी रस्त्यावर वाहत असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्यावर ५ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.
आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशानुसार उपअभियंता मिलिंद भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ अभियंता सचिन वेलदोडे, लाईनमन सय्यद अबरार, सचिन पवार, स्वच्छता निरीक्षक आणि नागरी मित्र पथकातील कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.
पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन
जिल्ह्यात पावसाची कमतरता असल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. जायकवाडी धरणात पाणीसाठा उपलब्ध असला तरी त्याचा वापर पुढील पावसाळ्यापर्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातील नळ, तोट्या आणि जलवाहिन्यांची गळती तातडीने दुरुस्त करून पाण्याचा प्रत्येक थेंब जपावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CF89MLzjXiJLRGIbwDr7te
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*