छत्रपती संभाजीनगर : ‘आला रे आला, गोविंदा आला…’चा जयघोष, ढोल-ताशांचा गजर आणि तरुणाईच्या उत्साहात आज शनिवारी (दि. ५) शहरात गोपाळकाल्याचा उत्साह शिगेला पोहोचणार आहे. कृष्णजन्मोत्सवानंतर शहरातील १४ प्रमुख चौकांमध्ये दहीहंडीचा थरार रंगणार असून, तब्बल ३० गोविंदा पथकांतील जवळपास ९ हजार गोविंदा हंडी फोडण्यासाठी सज्ज झाले आहेत. यंदा सहा ते सात थरांची उंची गाठण्याबरोबरच गेल्या वर्षीचा सात थरांचा विक्रम मोडण्याचा निर्धार पथकांनी केला आहे.

शहरात सुमारे ४० वर्षांपासून दहीहंडी उत्सवाची मोठी परंपरा आहे. दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांकडून दीड महिन्यापासून सराव सुरू आहे. यंदा विविध मंडळांकडून १ ते दीड लाख रुपयांपर्यंतच्या बक्षिसांची लयलूट होणार असल्याने पथकांमध्ये कमालीची चुरस निर्माण झाली आहे.

मंत्री अतुल सावे यांच्या ‘नमो दहीहंडी’ महोत्सवामुळे यंदाच्या उत्सवाला विशेष रंगत येणार आहे. कैलासनगर येथे अभिनेत्री स्पृहा जोशी, पुंडलिकनगर येथे मीरा जगन्नाथ, तर बजरंग चौकात तन्वी मुंडले उपस्थित राहून गोविंदा पथकांचा उत्साह वाढवणार आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे तरुणाईच्या उत्साहाला आणखी उधाण येण्याची शक्यता आहे.

शहरातील कॅनॉट प्लेस येथे स्वाभिमान दहीहंडी, टीव्ही सेंटर चौकात धर्मरक्षक दहीहंडी, गारखेडा, बजरंग चौक व कैलासनगर येथे नमो दहीहंडी, गुलमंडी येथे देवकीनंदन व गोपाला दहीहंडी, औरंगपुरा येथे अश्वमेध दहीहंडी, टीव्ही सेंटर येथे श्रीराम दहीहंडी, तर गांधी पुतळा येथे हुकमसेठ भारुका दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे.

उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. चार पोलिस उपायुक्त, सात सहायक पोलिस आयुक्त, २६ पोलिस निरीक्षक, ७९ एपीआय व पीएसआय तसेच १,२५० हून अधिक महिला व पुरुष अंमलदार तैनात असतील. याशिवाय ५०० होमगार्ड, दोन एसआरपीएफ कंपन्या आणि चार आरसीपी पथके राखीव ठेवण्यात आली आहेत. संवेदनशील आणि गर्दीच्या ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातूनही नजर ठेवली जाणार आहे.

दहीहंडी उत्सवात ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी डीजेला बंदी घालण्यात आली असून, मंडळांना केवळ दोन टॉप आणि दोन बेस लावण्याची परवानगी आहे. नियम मोडणाऱ्यांवर तसेच हुल्लडबाजी करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

गोविंदांच्या सुरक्षेसाठी शासनाकडून विमा संरक्षणाची तरतूद असून, सर्व गोविंदांची अधिकृत नोंदणी व यादी प्रशासनाकडे देणे आवश्यक आहे. अपघात झाल्यास उपचार, अपंगत्व किंवा मृत्यूच्या परिस्थितीत आर्थिक मदत मिळू शकते. मात्र, सुरक्षेचे नियम पाळणे आणि दुर्घटनेची तात्काळ नोंद करणे आवश्यक आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KYaIrqX6xIM3SpZ1FYjFWw?s=cl&p=a&ilr=0

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

438 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क