छत्रपती संभाजीनगर : शहरात आज रोजी साजरा होणाऱ्या दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिस दल सज्ज झाले आहे. उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी शहरात साडेबाराशेहून अधिक पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. गर्दीच्या ठिकाणी तसेच संवेदनशील भागांवर ड्रोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून करडी नजर ठेवण्यात येणार आहे.

गतवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवात ‘डीजे बंदी’ कायम ठेवण्यात आली आहे. साऊंड सिस्टीमसाठी केवळ दोन टॉप आणि दोन बेस लावण्यास परवानगी देण्यात आली आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तसेच हुल्लडबाजी करणाऱ्यांवर थेट कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिला आहे.

गतवर्षी शांतता समितीच्या बैठकीत सर्वपक्षीय नेते, उत्सव समित्यांचे पदाधिकारी आणि विविध संघटनांनी एकमताने ‘डीजे मुक्त’ दहीहंडी उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. त्याला शहरवासीयांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे यंदाही डीजेसह लेझर लाईटवर कडक निर्बंध ठेवण्यात आले आहेत.

परजिल्ह्यातून किंवा परराज्यातून रात्रीच्या वेळी छुप्या मार्गाने शहरात डीजेची वाहने आणली जाऊ नयेत, यासाठी शहराच्या सर्व सीमांवर कडक नाकाबंदी करण्यात येणार आहे. शहरातील साऊंड सिस्टीम व डीजे चालकांची पोलिसांकडून तपासणी केली जाणार आहे. तसेच आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजे चालकांची स्वतंत्र बैठक घेऊन नियमांची माहिती दिली जाणार आहे.

दरम्यान, दहीहंडी उत्सवात लेझर लाईटचा वापरही मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे लेझरच्या वापरावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. उत्सवादरम्यान नियमांचे पालन करून शांततेत उत्सव साजरा करण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KYaIrqX6xIM3SpZ1FYjFWw?s=cl&p=a&ilr=0

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

231 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क