छत्रपती संभाजीनगर : हिवरखेडा-गौताळा रस्त्यावरील मदरसा औरंगजेब आलमगीर येथे शुक्रवारी एक धक्कादायक घटना घडली. मदरशातील २४ विद्यार्थ्यांनी एरंडीच्या बिया बदाम समजून खाल्ल्याने त्यांना विषबाधा झाली. यानंतर विद्यार्थ्यांना पोटदुखीचा त्रास सुरू झाल्याने त्यांना तातडीने कन्नड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी तीन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती असून, सर्व विद्यार्थ्यांवर वैद्यकीय पथकाकडून उपचार सुरू आहेत.
पोटदुखीचा त्रास सुरू झाल्यानंतर रुग्णालयात दाखल
मिळालेल्या माहितीनुसार, मदरशातील विद्यार्थ्यांनी एरंडीच्या बिया बदाम समजून खाल्ल्या. त्यानंतर काही विद्यार्थ्यांना पोटदुखीचा त्रास जाणवू लागला. परिस्थिती लक्षात येताच त्यांना कन्नड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. फैजान शेख युसूफ, समीर मोहम्मद अन्सारी, नेहाल शेख नईमुद्दीन यांच्यासह एकूण २४ विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत.
७० विद्यार्थी शिक्षण घेतात
मदरशाचे शिक्षक महंमद अरफात यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा मदरसा २०१३ पासून सुरू असून, रेक्टर मुफ्ती महेबुब यांच्या देखरेखीखाली येथे सुमारे ७० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शुक्रवारी घडलेल्या घटनेमुळे मदरशातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
एरंडीच्या बियांमध्ये असते विषारी घटक
एरंडीच्या बियांमध्ये रायसिन (Ricin) नावाचे अत्यंत विषारी प्रथिन आढळते. विशेषतः बी चावली गेल्यास किंवा तिचे बाह्य आवरण तुटल्यास विष शरीरात शोषले जाऊ शकते. त्यामुळे मळमळ, उलट्या, पोटदुखी आणि इतर गंभीर लक्षणे उद्भवू शकतात. एरंडीच्या बिया खाल्ल्याचा संशय आल्यास तातडीने वैद्यकीय मदत घेणे आवश्यक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय उलटी करवण्याचा प्रयत्न करू नये.
कन्नड ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर दिलीपसिंग राजपूत, आकाश बोलधने, डॉ. शुभम राजपूत, स्वाती डोळस, चेतन कुमावत आणि ज्योती हिंगे यांच्यासह वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांवर उपचार केले. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी रुग्णालयात जाऊन मदतकार्य केले.
या घटनेनंतर परिसरात चिंता व्यक्त केली जात असून, विद्यार्थ्यांना अशा विषारी बियांपासून दूर ठेवण्यासाठी अधिक काळजी घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CF89MLzjXiJLRGIbwDr7te
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*