छत्रपती संभाजीनगर : शहरात उन्हाचा तडाखा वाढला असून सोमवारी (२५ मार्च) कमाल तापमान ३८.५ अंश सेल्सियस नोंदवले गेले. चिकलठाणा वेधशाळेच्या माहितीनुसार, किमान तापमान २० अंश सेल्सियस होते. वाढत्या उन्हामुळे नागरिक हैराण झाले असून दुपारच्या वेळेस रस्ते ओस पडलेले दिसत आहेत.
गेल्या आठवड्यात तापमानात चढ-उतार होत होते. १९ मार्च रोजी कमाल तापमान ३८ अंश सेल्सियस होते, त्यानंतर तापमान कमी झाले. मात्र, २१ मार्च ते २३ मार्च दरम्यान तापमानाचा लहरीपणा दिसून आला. अखेर सोमवारी पुन्हा उन्हाचा जोर वाढला आणि तापमानाने ३८.५ अंशांचा टप्पा गाठला. विशेष म्हणजे, गतवर्षी याच दिवशी कमाल तापमान ३५ ते ३६ अंश सेल्सियसच्या दरम्यान होते, त्यामुळे यंदाच्या उन्हाचा तडाखा अधिक तीव्र जाणवत आहे.
उन्हाच्या कडाक्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून, विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि कामगारवर्ग यांना याचा मोठा फटका बसत आहे. दुपारच्या वेळी बाहेर पडणे कठीण होत असून, उष्माघाताचा धोका वाढला आहे. डॉक्टर आणि हवामानतज्ज्ञांनी जास्त प्रमाणात पाणी पिण्याचा आणि गरम हवेत अनावश्यक बाहेर जाणे टाळण्याचा सल्ला दिला आहे.
आगामी काही दिवस उन्हाचा तडाखा असाच कायम राहण्याची शक्यता वेधशाळेने व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. उष्णतेपासून बचाव करण्यासाठी हलका आणि सैलसर कपडा घालावा, डोकं झाकून ठेवावे तसेच शक्य असल्यास दुपारी १२ ते ४ या वेळेत घराबाहेर जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Br29avqYAlRCU4ytjYm4PJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*