आजपासून मे महिना सुरु होताच देशभरात अनेक नवे नियम लागू होत असून त्याचा थेट परिणाम सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन जीवनावर होणार आहे. एलपीजी गॅस सिलिंडरपासून ते रेल्वे तिकीट बुकिंगपर्यंत, तसेच एटीएम व्यवहारांपासून ते ग्रामीण बँकांच्या संरचनेत मोठा बदल होणार आहे.
एलपीजी गॅस दरात बदलाची शक्यता
१ मेपासून ऑइल मार्केटिंग कंपन्या एलपीजी गॅसच्या किंमतीत फेरबदल करणार असल्याची शक्यता आहे. मागील महिन्यात १२ किलो घरगुती सिलिंडरच्या दरात ५० रुपयांची वाढ झाली होती. त्यामुळे यावेळी दर वाढ होणार की कपात, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.
एटीएफ, सीएनजी आणि पीएनजी दरात बदल
एअर टर्बाइन फ्यूल (ATF), सीएनजी आणि पीएनजीच्या दरातही बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याचा परिणाम प्रवास खर्चावर आणि वाहतुकीच्या दरावर होऊ शकतो.
एटीएम व्यवहार महागणार
रिझर्व्ह बँकेच्या नव्या नियमानुसार, १ मेपासून दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यावर प्रति व्यवहार १९ रुपये शुल्क आकारले जाणार आहे. तर बॅलन्स चेकसाठी आता ७ रुपये शुल्क लागणार आहे. या नियमामुळे अनेक बँकांनी आपल्या वेबसाइटवर सूचना देण्यास सुरुवात केली आहे.
रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये नवे नियम
रेल्वे प्रवास करणाऱ्यांसाठीही मोठा बदल होणार असून आता वेटिंग तिकीट केवळ जनरल कोचसाठीच लागू राहणार आहे. स्लीपर कोचसाठी वेटिंग तिकीट रद्द करण्यात आले असून, आगाऊ बुकिंग कालावधी १२० दिवसांवरून ६० दिवस करण्यात आला आहे.
‘One State-One RRB’ योजना लागू
१ मेपासून देशातील ११ राज्यांमध्ये ‘वन स्टेट, वन आरआरबी’ योजना लागू होणार आहे. यामध्ये संबंधित राज्यातील सर्व ग्रामीण बँका एकत्र करून एकच मोठी बँक तयार करण्यात येईल. या माध्यमातून ग्राहकांना अधिक सेवा आणि सुविधा मिळणार आहेत.
या सर्व बदलांचा सर्वसामान्यांच्या खिशावर थेट परिणाम होणार असून, नागरिकांनी नवीन नियमांची माहिती घेऊन नियोजन करणे गरजेचे ठरणार आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/JWPLw3ii1wAKDICCoiRTdD
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*