महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी परीक्षेचे हॉलतिकीट सोमवारपासून (ता. 20 जानेवारी) ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी ही हॉलतिकीट प्रिंट करून विद्यार्थ्यांना विनामूल्य द्यावीत, अशी सूचना शिक्षण मंडळाने दिली आहे.
यंदा दहावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारीपासून 17 मार्च 2025 पर्यंत होणार आहे. औरंगाबाद विभागातील (छत्रपती संभाजीनगर) जालना, बीड, परभणी, हिंगोली आणि संभाजीनगर अशा पाच जिल्ह्यांतील 2,737 शाळांमधून एकूण 1,88,777 विद्यार्थी परीक्षेस बसणार आहेत. या परीक्षांसाठी 644 परीक्षा केंद्रे आणि 64 परीरक्षक केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.
हॉलतिकीट गहाळ झाल्यास काय करावे?
विद्यार्थ्याचे हॉलतिकीट गहाळ झाल्यास, संबंधित शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयाने पुन्हा प्रिंट काढून त्यावर “द्वितीय प्रत” असा उल्लेख करावा. तसेच, मुख्याध्यापकांनी स्वाक्षरी आणि शिक्का मारून ते विद्यार्थ्याला द्यावे.
हॉलतिकीट दुरुस्ती कशी कराल?
हॉलतिकीटवरील नाव, आईचे नाव, जन्मतारीख अशा त्रुटी असल्यास, त्या ऑनलाइन पद्धतीने सुधारता येतील. दुरुस्ती शुल्क भरून विभागीय मंडळाकडे मान्यतेसाठी अर्ज करावा लागेल. मान्यतेनंतर सुधारित हॉलतिकीट उपलब्ध होईल. माध्यम किंवा विषय बदलाच्या दुरुस्तीसाठी विभागीय मंडळाशी थेट संपर्क साधावा, असे बोर्डाने स्पष्ट केले आहे.
विद्यार्थ्यांनी हॉलतिकीट तपासून मुख्याध्यापकांचा शिक्का आणि स्वाक्षरीची खात्री करून घ्यावी, असे आवाहन बोर्डाकडून करण्यात आले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/LJKkgCKh4n33MLqeQ0zqD2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*