गणेशोत्सवात गावोगावी ऐक्याचा संदेश देणारी ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना यंदाही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मोठ्या उत्साहात राबविली जात आहे. या उपक्रमात तब्बल ५६० गावे सहभागी झाली असून, यामुळे गावांतील वाद, अनावश्यक खर्च आणि ध्वनिप्रदूषणाला आळा बसत आहे.
दरवर्षी गणपती बसविताना गावांमध्ये अनेकदा वाद निर्माण होतात. त्यावर तोडगा म्हणून काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात ही संकल्पना सुरू करण्यात आली. पोलिस विभागाने यंदाही गावागावांत बैठक घेऊन उपक्रमासाठी प्रयत्न केले. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी सांगितले की, “गावकऱ्यांशी सातत्याने संवाद साधून आम्ही एकोप्याचे हे वातावरण निर्माण केले. दरवर्षी अधिकाधिक गावे सहभागी करण्याचा आमचा प्रयत्न असतो.”
यंदा जिल्ह्यातील २३ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत १६०० सार्वजनिक गणेश मंडळांची नोंदणी झाली आहे. डीजे वापर टाळण्याचे आवाहन पोलिसांनी केले असून, पारंपरिक वाद्यांवर भर दिला जात आहे. यामुळे धार्मिक उत्सवाला सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांची जोड मिळाली आहे. गावात भजन, कीर्तन, रक्तदान शिबिरे, महिलांसाठी आणि तरुणांसाठी विविध स्पर्धा यांचे आयोजन करण्यात येत आहे.
या संकल्पनेत सर्वाधिक गावे सिल्लोड ग्रामीण (४६), पिशोर (४१) आणि शिरुर (३६) यांनी भाग घेतला आहे. करमाड आणि वडोद बाजार येथे प्रत्येकी ३५, सिल्लेगाव २७, खुलताबाद २६, फुलंब्री २४, बिडकीन, देवगाव आणि कन्नड ग्रामीण प्रत्येकी २१ गावांनी सहभाग नोंदवला. गंगापूर, सोयगाव प्रत्येकी १३, विरगाव आणि पाचोड प्रत्येकी १२ तर पैठण, फर्दापूर, कन्नड शहर प्रत्येकी ८ गावांनी एकच गणपती बसविला आहे.
या उपक्रमामुळे गावागावात सामाजिक सलोखा वाढला असून खर्चाला आळा बसत आहे. ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना महाराष्ट्रासाठी आदर्शवत ठरत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/INIt76ceHKUABNJR2KWGnv?mode=ems_copy_c
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*