छत्रपती संभाजीनगर : शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी महापालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शहरातील पाच प्रमुख रस्त्यांवरील रस्ता रुंदीकरण आणि विकासासाठी सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यानुसार जालना रोड, पैठण रोड, बीड बायपास, जळगाव रोड आणि पडेगाव रोड या प्रमुख मार्गांवर नव्या उड्डाणपुलांसह भुयारी मार्गांची उभारणी होणार आहे. पेडको (PEDCO) या शासनमान्य एजन्सीकडून तयार केलेला हा अहवाल गुरुवारी (दि.१६) स्मार्ट सिटी कार्यालयात प्रशासक जी. श्रीकांत यांच्या उपस्थितीत सादर करण्यात आला.

या बैठकीस नगररचना उपसंचालक मनोज गर्जे, शहर अभियंता फारुख खान, ए. बी. देशमुख, कार्यकारी अभियंता संजय कोबडे, अनिल तनपुरे, वसंत भोये, पेडकोचे प्रतिनिधी विजय पवार तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI), सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआरडीसी आणि महावितरणचे अधिकारी उपस्थित होते.

महापालिकेने रस्ता विकासासाठी याआधी पाडापाडी करून अडथळा ठरणाऱ्या मालमत्ता जमीनदोस्त केल्या होत्या. ज्या पाच प्रमुख रस्त्यांचा समावेश आहे त्यात पडेगाव-मिटमिटा रस्ता, पैठण रोड, महानुभाव आश्रम ते झाल्टा फाटा बीड बायपास, जालना रोड आणि जळगाव रोड यांचा समावेश आहे. प्रशासक जी. श्रीकांत यांनी या विकास योजनांबाबत केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी, संरक्षण मंत्री राजनाथसिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याशी चर्चा करून प्रकल्प अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.

पेडको एजन्सीने फक्त दोन महिन्यांत या सर्व रस्त्यांचे माती परीक्षण, वाहतूक घनता सर्वेक्षण आणि आराखडा पूर्ण केला. या आराखड्यात जालना रोडवर सध्याच्या चार उड्डाणपुलांव्यतिरिक्त आणखी तीन उड्डाणपुलांची शिफारस करण्यात आली आहे. यात हायकोर्ट सिग्नलजवळ, मुकुंदवाडी चौक आणि धूत हॉस्पिटल ते सुखना नदी पूल दरम्यान उड्डाणपूल उभारण्याची सूचना आहे.

पैठण रोडवर रेल्वे स्टेशनवरील विद्यमान उड्डाणपूल महानुभाव आश्रमपर्यंत वाढविणे तसेच नक्षत्रवाडी ते बिडकीनदरम्यान डबल डेक्कर उड्डाणपूल बांधण्याची शिफारस करण्यात आली आहे. बीड बायपासवर सध्या अस्तित्वात असलेल्या तीन पुलांव्यतिरिक्त आणखी तीन नवीन उड्डाणपूल उभारावेत, असेही नमूद करण्यात आले आहे.

नगर नाका ते पडेगाव या मार्गावर सहा लेनचा डबल डेक्कर उड्डाणपूल उभारण्याची तर सैन्यदल क्षेत्राजवळ भुयारी मार्ग टाकण्याची सूचना देण्यात आली आहे. तसेच जळगाव रोडवरील गरवारे कंपनी, डॉ. आंबेडकर चौक आणि अहिल्यादेवी होळकर चौक येथे तीन उड्डाणपुलांची उभारणी करण्यात यावी, असे आराखड्यात नमूद केले आहे.

शहरातील वाढत्या वाहतुकीला तोंड देण्यासाठी आणि नागरिकांना सुलभ प्रवास सुविधा मिळण्यासाठी हा प्रकल्प मोलाचा ठरणार आहे. लवकरच हा सविस्तर आराखडा शासनाला मंजुरीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IUr4T19zTCmAWLrpodS5ui?mode=ems_copy_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

3,009 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क