छत्रपती संभाजीनगर : शहराच्या वाहतूक व्यवस्थेला नवे रूप देण्यासाठी आणि वाढत्या गर्दीचा ताण कमी करण्यासाठी महापालिकेकडून पाच प्रमुख रस्त्यांच्या विकासाचा महत्त्वाकांक्षी आराखडा तयार करण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी ‘पेडेको’ या नामांकित संस्थेमार्फत सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम वेगाने सुरू असून, तब्बल १४ उड्डाणपुलांचा समावेश या योजनेत करण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाची एकूण किंमत तीन हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महापालिकेने शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण करण्याचा निर्णय यापूर्वी घेतला होता. जून महिन्यापासूनच पाडापाडीच्या कामांना सुरुवात करण्यात आली आहे. पडेगाव-मिटमिटा, पैठण रोड, महानुभाव आश्रम-झाल्टा फाटा, बीड बायपास, जालना रोड आणि जळगाव रोड हे रस्ते रुंद करण्यात आले आहेत. आता या सर्व रस्त्यांना आधुनिक व सर्व सुविधायुक्त बनवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न सुरू आहे.
या प्रकल्पासाठी प्रशासक जी. श्रीकांत यांनी केंद्र आणि राज्य शासनाकडून निधी मिळवण्यासाठी मोठे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी, संरक्षण मंत्री राजनाथसिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. त्यानंतर प्राथमिक स्वरूपाचा २०५० कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. यानंतर ‘पेडेको’ या संस्थेला डीपीआर तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली असून, संस्थेचा सखोल अभ्यास मागील दोन महिन्यांपासून सुरू आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, रस्ते विकास महामंडळ, महानगरपालिका आणि इतर संबंधित विभागांच्या समन्वयाने या कामांसाठी अलीकडेच संयुक्त बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत पेडेकोने प्राथमिक सादरीकरण सादर केले. या अहवालात महत्त्वाच्या १४ उड्डाणपुलांचा समावेश करण्यात आला असून, काही नवे प्रस्ताव देखील विचाराधीन आहेत.
डीपीआरमधील प्रमुख उड्डाणपूल योजनांमध्ये महावीर चौक-पडेगाव डबल डेकर उड्डाणपूल, नगरनाका-दौलताबाद टी पॉइंटदरम्यान भुयारी मार्ग, नगरनाका-पडेगाव हनुमान मंदिरापर्यंत उड्डाणपूल, पैठण रोडवरील रेल्वे उड्डाणपूल महानुभाव आश्रमापर्यंत वाढवणे, नक्षत्रवाडी-बिडकीन डबल डेकर उड्डाणपूल, तसेच बीड बायपासवरील तीन उड्डाणपुलांचा समावेश आहे. जालना रोडवरील हायकोर्ट सिग्नल, मुकुंदवाडी चौक आणि धूत हॉस्पिटल-सुखना नदीदरम्यान उड्डाणपूल बांधण्याची योजना असून, जळगाव रोडवरील गरवारे कंपनी, डॉ. आंबेडकर चौक आणि अहिल्यादेवी होळकर चौक येथे उड्डाणपुलांचा समावेश करण्यात आला आहे.
नव्या सुचवलेल्या दोन उड्डाणपुलांमध्ये क्रांती चौक-रेल्वे स्टेशन उड्डाणपूल आणि रेल्वे स्टेशन-महावीर चौक उड्डाणपूल या योजना सर्वाधिक महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. प्रशासक जी. श्रीकांत यांनी सांगितले की, “हा डीपीआर पुढील ३० वर्षांचा विचार करून तयार केला जात आहे. त्यामुळे या योजनेमुळे शहराच्या वाहतूक व्यवस्थेला दीर्घकालीन स्थैर्य मिळेल,” असे ते म्हणाले.
या प्रकल्पाच्या अंमलबजावणीमुळे शहरातील वाहतूक कोंडीवर मोठा तोडगा निघण्याची शक्यता आहे. आधुनिक रस्ते, उड्डाणपुलं, भुयारी मार्ग आणि नियोजित वाहतूक व्यवस्थेमुळे छत्रपती संभाजीनगरचा चेहरामोहरा बदलणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/HECW4lJo5J4AfPZGuYcj4E?mode=wwt
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*