छत्रपती संभाजीनगर : नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामामुळे छत्रपती संभाजीनगर शहरातील पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम होणार असून नागरिकांनी पुढील काही दिवस पाणीटंचाईचा सामना करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पैठण रोडवरील टाकळी फाटा येथे २५०० मिलिमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनी जोडणीचे महत्त्वाचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामासाठी रविवारीपासून सलग सहा दिवसांचा शटडाऊन घेण्यात आला असून सध्या कार्यरत असलेल्या ९०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीवरील पुरवठा थांबणार आहे.
महापालिका प्रशासनाच्या माहितीनुसार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या (मजीप्रा) विनंतीवरून हा शटडाऊन मंजूर करण्यात आला आहे. याच कालावधीत ढोरकीन पंपहाऊस परिसरातील ९०० मिलिमीटर जलवाहिनीला लागलेली मोठी गळतीही दुरुस्त केली जाणार आहे. मुख्य जलवाहिनी जोडणी आणि गळती दुरुस्ती ही दोन्ही कामे एकाच शटडाऊनमध्ये करून घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
दरम्यान, ७०० आणि १२०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिन्यांवरून पाणीपुरवठा सुरू राहणार असला तरी शहराला उपलब्ध होणारे पाणी १२५ एमएलडीपर्यंत मर्यादित राहणार आहे. त्यामुळे काही भागांमध्ये पाणीपुरवठ्यात एक ते दोन दिवसांचा विलंब अपरिहार्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
यामुळे चिकलठाणा, हनुमान टेकडी आणि विश्वभारती कॉलनी या जलकुंभांवरून होणारा पाणीपुरवठा नेहमीपेक्षा अधिक उशिराने होईल, अशी माहिती कार्यकारी अभियंता किरण धांडे यांनी दिली. नागरिकांनी या कालावधीत पाण्याचा वापर काटकसरीने करावा, अनावश्यक वापर टाळावा, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.
महत्त्वाच्या जलवाहिनी जोडणीचे काम पूर्ण झाल्यानंतर शहरातील पाणीपुरवठा अधिक सक्षम आणि स्थिर होण्यास मदत होणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, तात्पुरत्या शटडाऊनमुळे पुढील काही दिवस शहरातील अनेक भागांना पाणीपुरवठा उशिराने होणार असून नागरिकांनी यासाठी तयार राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/FkdbQ7CBnF2FSoNwbVDkV8
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*